सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी मनोज उर्फ महेश गणपत इंगळे वय 24 व सोनल गणेश इंगळे वय 31 दोघेही रा. आखरी रास्ता, मंगळवार पेठ, फलटण ही टोळी दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आली आहे.
हद्दपार प्राधिकरणासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले. या टोळीला सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथूनही दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. फलटणचे उपअधीक्षक राहुल धस यांनी हद्दपार प्राधिकरण समिती पुढे हा प्रस्ताव सादर केला होता. सदर टोळीतील इसमांवर दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही.
फलटण तालुक्यातील नागरिकांना या टोळीचा वारंवार उपद्रव होत होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी इंगळे टोळीला सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.
नोव्हेंबर 2022 पासून 34 उपद्रवी टोळ्यांमधील 110 इसमांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 152 इसमांवर ही कारवाई झाली आहे.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाण्याचे बापू धायगुडे, सचिन जगताप, जितेंद्र टिके यांनी योग्य तो पुरावा सादर केला.