पुसेगाव : तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करुन आणि खटावला पुन्हा एकदा आमदारकीची संधी मिळावी या उदात्त हेतूने मी आणि माझ्या परिवर्तन संघटनेने आ. महेश शिंदे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंत त्यांच्या राजकीय वाटचालीत आम्ही निस्वार्थीपणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडून त्यांना सर्वोतपरी सहकार्य केले. आमदारही प्रत्येक भाषणात जिल्हा परिषदेसाठी माझे नाव घेत घेत होते, मात्र आता अचानक माझ्यावर खोटे आरोप करुन विनाकारण माझी माझी बदनामी करत मला डावलण्याचे षडयंत्र सुरु झाले आहे. हे आरोप माझ्या सहकाऱ्यांच्या जीव्हारी लागले आहेत, म्हणूनच आम्ही सत्तेचे केंद्रीकरण रोखण्यासाठी आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.
खटाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परिवर्तन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राहुल पाटील पुढे म्हणाले, खटाव आणि परिसरात मा. आ. चंद्रहार पाटील ( दादा ) आणि मा. आ. केशवराव पाटील ( आण्णा ) यांच्या विचारांची जोपासना करत तसेच खटाव आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोण ठेवून मी समाजकारणात आणि राजकारणात आलो. जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी माझ्या संघटनात्मक वाटचालीचा प्रारंभ केला. तरुणांची आणि आण्णा, दादांच्या विचारांच्या जेष्ठांची मोठी फळी जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या पाठिशी उभी राहिली. सुरुवातीच्या काळात माझ्या एकला चलो या भूमिकेला खटावकरांनीही मोठी साथ दिली. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याचा वसा घेऊन सुरु केलेल्या माझ्या वाटचालीत असंख्य जीवाभावाचे सहकारी सहभागी झाले.
तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करुन आणि खटावला पुन्हा एकदा आमदारकीची संधी मिळावी या उद्दात हेतूने आम्ही सर्वानुमते आ. महेश शिंदे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या सोबत काम करताना त्यांना नेहमीच सर्वोतपरी सहकार्य केले. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
आता तब्बल ९ वर्षानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडत आहेत. खटाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार स्वतः जिल्हा परिषद निवडणूकीसाठी माझे नाव जाहीर करत होते, मात्र आता अचानक माझ्यावर खोटे आरोप करुन विनाकारण माझी बदनामी करत मला डावलण्याचे षडयंत्र सुरु झाले आहे. माझ्यावर आणि माझ्या स्वाभिमानी सहकाऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे. सध्या घडणाऱ्या घडामोडी माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागत आहेत. त्यांचा माझ्यावरील दबाव वाढत आहे. खटाव गट आत्ता खुला झाला आहे. त्यामुळे आम्ही येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भागातील माझ्या वरिष्ठ आणि तरुण सहकारी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करुन लवकरच योग्य राजकीय निर्णय घेणार आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेला खटाव आणि परिसरातील सूज्ञ जनता निश्चित पाठिंबा देईल असा विश्वासही राहुल पाटील यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, राजेंद्र करळे, दादासाहेब मोहिते, डॉ. महेश भिसे, मुसाभाई काझी, नवनाथ बोर्गे पाटील, तैमूरभाई मुल्ला, सुधाकर पवार उपस्थित होते.
सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित युवा नेतृत्वाला संधी मिळायला हवी
उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत राहुल पाटील यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आणि विकासाचा दृष्टीकोण असणारे आहे. चुकीच्या पध्दतीचे राजकारण होवून त्यांना डावलण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. सर्वच बाजूंनी सक्षम असणाऱ्या आमच्या नेतृत्वाला संधी मिळायलाच हवी. त्यांनी प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली आहे. अशा आमच्या प्रामाणिक नेतृत्वाला संधी मिळायलाच हवी. आम्ही कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांना भक्कमपणे सामोरे जाणार असल्याची भूमिका परिवर्तन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.