राज्याच्या राजकारण आणि समाजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व गमावलं - माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील

by Team Satara Today | published on : 28 January 2026


सातारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दु:खदायक आहे. अजितदादांना मी लहानपणापासून पहात आलो असून सामान्य कार्यकर्त्याचे वटवृक्षात रूपांतर होताना आपल्या समोर ते अचानक गळून पडल्याचे पहाणे हे अतिशय वेदनादायी आहे, अशी भावना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त करत अजितदादा पवार याना श्रद्धांजली अर्पण केली. 

ते म्हणाले, त्यांचे वडील अनंतराव पवार हे माझे स्नेही होते. १९५८ सालापासून पवार कुटुंबीयांच्या घरी माझे येणे - जाणे असल्याने अजितदादांना त्यांच्या जन्मापासून, लहानपणापासून अगदी जवळून पाहत आलो आहे. त्यांच्या शालेय जीवनापासून ते एक उमदा कार्यकर्ता म्हणून सुरुवात होत असताना मी पुण्याचा कलेक्टर होतो. तेव्हा ते नेहमी तळमळीने बारामती भागातील कामे करून घेण्यासाठी माझ्याकडे येत असत.

त्यानंतर ते बारामती लोकसभेचे खासदार आणि मी पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचा आयुक्त होतो. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या काळात मी प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्ही एकत्र काम केले आहे. त्यानंतरही ते आमदार, राज्यमंत्री आणि मी प्रशासकीय अधिकारी असे समीकरण राहिले होते. त्यांची प्रशासनातील पकड, काम करण्याची हातोटी आणि वाढत चाललेले प्रशासकीय कौशल्य पाहून आम्हाला अतिशय आनंद होत असे. त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पदापर्यंत गवसणी घातली याचाही अभिमान होता. सबंध महाराष्ट्र व महाराष्ट्रातील प्रश्न त्यांनी अभ्यासले होते. तळागाळातील प्रश्नांची जाण असणारे असे हे नेतृत्व गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर झालेच आहे, त्याचबरोबर पवार कुटुंबाचे नुकसान झाले आहे आणि त्याच कुटुंबाचा भाग असल्याने आमचे नुकसान झाले आहे. राजकीय प्रवास काही असला तरी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री असा वाढत चाललेला त्यांचा वकूब पाहून त्यांचा नेहमी अभिमान वाटायचा. 

अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व होते. ग्रामपातळीपासून ते राज्याच्या शासन स्तरावर त्यांनी जनतेच्या विकासासाठी काम केले. सार्वजनिक जीवनात कार्यरत राहण्याची त्यांची ऊर्मी लक्ष वेधून घेणारी होती. सहकार, राजकारण, समाजकारणात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांची निर्णायक आणि स्पष्टवक्तेपणाची शैली सर्वांना परिचित होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मन हेलावून गेलं आहे. त्यांच्या सोबत घालवलेले क्षण, आपुलकी आणि आमच्या कुटुंबियाप्रति असलेला जिव्हाळा कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारण आणि समाजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व गमावलं आहे. हा धक्का पचवणं कठीण असून पवार कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो अशी प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांचा वाढे येथे रूट मार्च; आचारसंहिता अनुषंगाने ब्रिफिंग करून आवश्यक सूचना
पुढील बातमी
दर्जेदार कामावर भर देणारा वक्तशीर राजकारणी - अजितदादा पवार ; महाराष्ट्राला चटका लावणारी एक्झिकट

संबंधित बातम्या