आंदोलन ही एक 'संयुक्त' चळवळ, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मिळवणे हेच ध्येय - राहुल गांधी, इंडिया आघाडीच्‍या बैठकीत आंदोलनाच्‍या पुढील रणनीतीवर चर्चा

by Team Satara Today | published on : 13 October 2026


नवी दिल्‍ली: दिल्लीतील राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया'  आघाडीच्या बैठकीनंतर आज (दि. १३) विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. देशातील लोकशाही नष्ट केली जात आहे. हा संघर्ष म्हणजे केवळ अनेक स्वतंत्र लढायांची मालिका नसून ती एकच संयुक्त चळवळ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांचा राजीनामा मिळवणे हेच त्यांचे ध्येय आहे, असे पत्रकार परिषदेत लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले.
राहुल गांधींनी विरोधी पक्षांचे नेते आणि विद्यार्थी संघटनांना चहापानासाठी व चर्चेसाठी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. ज्ञानेश कुमार आणि एसआयआर (SIR) यांच्या विरोधातील आंदोलन पुढे नेण्याच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी करत, विरोधी पक्षांनी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, "विरोधी पक्षाचा लढा सुरूच राहील आणि ध्येय साध्य होईपर्यंत तो अविरतपणे चालू राहील. यासाठी एक दिवस, काही दिवस किंवा अगदी दोन वर्षे लागली तरीही त्यांची टीम थांबणार नाही."
इंडिया आघाडीसोबत आम्ही ताकदीने उभा राहणार : सुप्रिया सुळे
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्‍या खासदार सुप्रिया सुळे म्‍हणाल्या की, "इंडिया आघाडीसोबत आम्ही ताकदीने उभा राहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला वाचवण्यासाठी हे आंदोलन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सुरू राहील."
भाजपने गैरसमजातून बाहेर पडावे : नेहा बोरा
यावेळी AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा म्हणाल्या की, आपण लोकशाहीच्‍या पायावर प्रहार करू, असा भाजपचा समज असेल तर त्‍यांनी या गैरसमजातून बाहेर पडावे. लोक आपल्या मतदानाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांचा निषेध करण्याचा अधिकार हिरावून घेऊन त्यांच्याकडून गप्प राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकत असेल, तर भाजपचा हा गैरसमज आहे.
ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल : डी. राजा
माकपचे डी. राजा म्‍हणाले की, आजच्‍या बैठकीत आम्‍ही देशाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. मुख्‍य निवडणूक आयुक्‍त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल. दिल्लीत प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत, लोक मुक्त संचार करू शकत नाहीत. जंतरमंतर ही आंदोलनाची जागा यांनी बंद केली, आम्ही याचा निषेध केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांचा मंत्रीपदासह राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा
पुढील बातमी
शनिवार वाड्यासमोर ४ खुर्च्या ठेवा, भाजपच्या उमेदवारांसोबत खुली डिबेट होऊ द्या; जयंत पाटलांचे उघड आव्हान

संबंधित बातम्या