सातारा : जावळी तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना तुमच्या हक्काचा आहे. हा कारखाना सर्वांच्या सहकार्याने सक्षम होईल. कारखाना सक्षम झाल्यास तालुक्यातील शेतकर्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. अनेक अडचणी असून, स्पर्धेत टिकण्यासाठी कारखाना काटकसरीने चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज प्रतापगडची स्थिती नाजूक असली, तरी भविष्यात आपण नक्कीच सर्वांच्या पुढे असू, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सोनगाव, ता. जावळी येथील अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योग संचलित प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून उत्साहात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, दोन्ही कारखान्याचे संचालक व शेतकरी उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी कारखान्याची उभारणी केली. आज हे दोन्ही नेते आपल्यात नाहीत; परंतु कारखाना सुरू आहे. आपला उस हक्काच्या प्रतापगड कारखान्यात गाळपासाठी पाठवून, तो सक्षम करण्यात सर्वांनी योगदान द्यावे. यंदाच्या हंगामासाठी 7700 हेक्टर उसाची नोंद झाली असून, तोडणी व वाहतूक यंत्रणाही सज्ज आहे. कारखान्याचे खरे मालक सभासद शेतकरी आहेत, आम्ही फक्त केअर टेकर आहोत. हा कारखाना जोमाने सुरू राहणे गरजेचे आहे, येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, या हेतूने आम्ही कारखाना सुरु केला आहे. कारखान्याचे कामकाज राजकारणविरहित असून, गटतट न पाहता, सर्वांचा ऊस घेतला जाणार आहे. ऊस दराबद्दल कोणीही चिंता करू नये.
सौरभ शिंदे म्हणाले, हा कारखाना दोन हंगामांपासून सुरू आहे, हे तालुक्यासाठी महत्त्वाचे आहे. नव्या सुरुवातीमध्ये अजिंक्यतारा कारखान्याचे मोलाचे योगदान आहे, कारखान्यामुळे सर्व चक्र गतिमान होणार असून, सभासद शेतकरी व कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार्य करावे. शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव साळुंखे यांनी आभार मानले.