सातारा : सातारा शहराच्या पूर्वेला करंजे-म्हसवे या बारा मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, राजकीय दबावामुळे तेथील अतिक्रमणे काढली जात नसल्याने, या कामाला मर्यादा येत आहेत. ही अतिक्रमणे न काढल्यास येत्या दोन दिवसांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करंजे-म्हसवे रस्त्यावरील वसाहतींमधील नागरिकांनी दिला आहे.
शहराच्या हद्दवाढीच्या भागांमध्ये विकासकामे सुरू आहेत. त्यात करंजे-म्हसवे रस्ता बारा मीटर रुंद करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग असल्याने, वाहतूक कोंडी होत आहे. काही वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. येथील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात तेथील नागरिकांनी पालिकेचे प्रशासक अभिजित बापट यांना चार निवेदने दिली होती. बापट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसमवेत या रस्त्याची पाहणी केली होती. तेथील अतिक्रमणे काढली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, राजकीय दबावामुळे ही अतिक्रमणे काढली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ही अतिक्रमणे न हटवल्यास येत्या दोन दिवसांत हा रस्ता अडवण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.