सातारा : किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून आरफळ, ता. सातारा येथील अमर मुगुटराव नलगे (वय 45) यांच्या डोक्यात लोखंडी खोरे मारून त्यांचा खून करून फरार झालेला संशयित आरोपी ऋषिकेश मारुती कासकर (वय 24) याला काही तासांमध्ये अटक करून सातारा तालुका पोलिसांनी तत्पर कामगिरी बजावली आहे.
याबाबत माहिती अशी की, काही दिवसापूर्वी आरोपी ऋषिकेश कासकर यांच्या गाडीतील पेट्रोल चोरीस गेले होते. यावेळी त्याने अमर नलगे यांच्या मुलावर आरोप घेतल्याने अमर व ऋषिकेश याच्यात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी अमरची पत्नी भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आली होती. परंतु, रागाच्या भरात आरोपी ऋषिकेश याने घरात जाऊन लोखंडी खोरे आणून अमरच्या डोक्यात घातले.
यावेळी अमर गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब सातारा जिल्हा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने आरफळ गावात मोठा तणाव निर्माण झाला. अमर यांचे वडील गेल्या सहा महिन्यापूर्वीच कृष्णा नदीतून वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यातच अमर हा कुटुंबात एकटाच कर्ता पुरुष होता. अमर यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला असून अमरच्या पश्चात पत्नी आई व दोन मुले आहेत.
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत रात्री उशिरा संशयित ऋषी मारुती कासकर (वय 25) याला जेरबंद केले आहे. घटना घडल्यानंतर तातडीने तपास करत रात्री उशिरा त्याला अटक केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.