पुणे : इस्त्रायल मध्ये होणाऱ्या कामगार भरतीसाठी पुण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय, औंधमध्ये उत्तर प्रदेश किंवा बिहार मधून मुलाखतींसाठी आलेल्या बेरोजगारांचे हाल होत असून दररोज किमान तीनशे ते चारशे जणांना रस्त्यावर झोपणे भाग पडत आहे. दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने तर त्यांची दैना झाली. मदतीचा कसलाही हात न देता पुणेकरांनी आणि असंवेदनशील शासकीय यंत्रणेने बेरोजगारांची क्रूर थट्टा केल्याचे दिसून येत आहे.
इस्त्रायल मध्ये १० हजार बांधकाम मजूर किंवा सुतार आदींची भरती होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि इस्त्रायल सरकार मध्ये झालेल्या करारानुसार ही भरती होत आहे. सुमारे १ लाख जणांची भरती होणार आहे. आयटीआय मध्ये त्यांच्या १६ तारखेपासून मुलाखती सुरू आहेत.
इस्त्रायल दुतावासाकडून बेरोजगार उमेदवाराशी मोबाईलवर संपर्क साधला जातो. पुण्यात आयटीआय मध्ये मुलाखतीसाठी जाण्याची सूचना केली जाते. मुलाखती पूर्ण झाल्यावर व्हिसासाठी ६५ हजार रुपये भरावे लागतात. १६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान मुलाखती होत आहेत. मात्र शेकडो मैलाचा प्रवास करुन पुण्यात आलेल्यांना आपले नाव यादीत नाही असे समजल्यावर धक्का बसतो. तरीही शेवटच्या यादीत आपले नाव येईल या आशेवर हे बेरोजगार पुण्यात ठाण मांडून आहेत. सकाळी ८ वाजता मुलाखती सुरू होतात. सायंकाळी ५ नंतर आयटीआयचे प्रवेशद्वार बंद करून उमेदवारांना बाहेर घालवले जाते.
विनोद पासी ( आझमगड, उत्तर प्रदेश) याने सांगितले की, १६ तारखेपासून आपण येथे आलो आहोत. मात्र यादीत नाव नाही, असे सांगितले गेले. शेवटच्या यादीत नाव येईल या आशेवर आहे. पावसामुळे झोपण्याचे हाल झाले. खायला नीट मिळत नसल्याने अंगात त्राण नाही. अजय चौहान (रोहतास, बिहार) मनीष कुमार ( गाझीपूर ) मुनीलाल प्रसाद ( चंदोली,बनारस) अभिषेक पासवान (आझमगड) यांनीही अनेक तक्रारी केल्या. ‘यूपीवालोंको महाराष्ट्र में कोई सहारा नहीं, महाराष्ट्र के उम्मीदवारोंकी झटसे इंटरव्ह्यू होती है, पासपोर्ट भी दिया जाता है’ असे त्यांचे म्हणणे होते.
सायंकाळनंतर बेरोजगार युवकांना मोबाईल चार्जिंगसाठी एखाद्या स्वच्छतागृहाचा आसरा घ्यावा लागतो. काही जणांनी, रात्रीच्या वेळी नैसर्गिक विधि दाबून ठेवावे लागतात, असे सांगितले. जवळचे पैसे संपले त्यामुळे गावी परत कसे जावे, असा प्रश्न असल्याचे मनिष कुमार याने सांगितले. तर एकाने आपले नाव यादीत न येण्यामागे भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला.
दरम्यान, आयटीआय उपसंचालक आर.बी.भावसार यांच्याशी वारंवार मात्र संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
औंध आयटीआयच्या बाहेरच्या फूटपाथवर गेल्या आठवड्यापासून तीनशे ते चारशे तरुण मुक्काम ठोकून असून त्यांची जेवण्याची , स्वच्छतागृहाची, झोपण्याची कसलीही सोय नाही. त्यामुळे रस्त्यावर राहणे, वडापाव खाऊन पोट भरणे आणि दूर जाऊन नैसर्गिक विधि आटोपणे त्यांच्या नशिबी आले आहे.