सातारा, दि. ८ (प्रतिनिधी) - महिलांनी बचत गटाद्वारे छोट्या उद्योगातून स्वतःचे उत्पादन बाजारात आणून त्याचा ब्रॅण्ड बनवावा. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन गुंफण अकादमीचे अध्यक्ष, साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले.
चिखली (ता. कराड) येथे आजी माजी सैनिक संघटना, श्री दुर्गामाता महिला बचत गट, श्री सरस्वती माता महिला बचत गट व श्री भवानी माता महिला बचत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. चेणगे बोलत होते. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असला तरी सर्वांनीच आपल्या भवितव्याविषयी सजग राहिले पाहिजे. युवकांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशभरात मिळेल त्या ठिकाणी जाऊन नोकरी, व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ. बसवेश्वर चेणगे यांना नुकताच सातारा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल या कार्यक्रमात त्यांचा आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. चेणगे यांच्या हस्ते श्री दुर्गामाता महिला बचत गट व श्री सरस्वती माता महिला बचत गट या दोन्ही बचत गटाच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यवसायाच्या मानधनाच्या धनादेशांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात चिखली गावातील ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले नाईक विजय माळी, नाईक सूरज पवार, हवालदार आनंदराव पाटील, सीआरपीएफमध्ये निवड झाल्याबद्दल भरत सावंत, आगाशिवनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल डॉ. पल्लवी माळी, तसेच संघटनेला वृक्षारोपनासाठी दोनशे झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. पल्लवी माळी यांनी महिलांचे आरोग्य, देखभाल, योगा, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदीबाबत माहिती दिली व आरोग्य जपण्याचे आवाहन केले. यावेळी सेवारत नाईक विजय माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सावंत यांनी महिला बचन गटाचे उपक्रम, बचत गटांच्या बसेसची सद्यस्थिती, संघटनेच्या माध्यमातून केलेले प्रकल्प याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी माजी सैनिकांच्या समस्यांबाबत संपर्क साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास संघटनेचे माजी अध्यक्ष पांडुरंग माळी, विजय सावंत, सुरेश माळी, प्रकाश पाटील, महादेव गावडे, महादेव माळी यांच्यासह चिखली येथील आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भीमराव सावंत यांनी केले. राजाराम माळी योनी आभार मानले.