आंबोली चौकुळमध्ये पाणवठ्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन

by Team Satara Today | published on : 22 May 2025


सिंधुदुर्ग :  पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने नटलेले आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली चौकुळमध्ये काही तरुणांना मंगळवारी पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. आंबोलीहून चौकुळकडे जात असताना जांभळकोंड येथील पाणव-ठ्यावर हा पट्टेरी वाघ पाण्यामध्ये यथेच्छ डुंबत होता. या तरुणांनी वाघाची छायाचित्रे टिपत व्हिडीओही काढले. काही वेळाने हा वाघ तेथून निघून गेला.

आंबोलीतील चौकुळ मार्गे ये-जा करताना पट्टेरी वाघाचे दर्शन यापूर्वी बऱ्याच वेळा झाले आहे. वन विभागाला त्यांच्या स्वयंचलित कॅमेऱ्यामध्ये वाघाची छबी अनेक वेळा मिळाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये दहा ते बारा वाघांच्या नोंदी आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. अनेकदा वाघांचे दर्शन बऱ्याच ठिकाणी झाले आहे. 

महिन्याभरापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील दाभील जंगलातील ऐतिहासिक पांडवकालीन विहिरीत एक पूर्ण वाढ झालेली वाघीणही मृतावस्थेत आढळून आली होती. त्यामुळे सिंधुदुर्गातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे दोडामार्ग, तिलारी, आंबोलीचे जंगल हे संवर्धित करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांमधून तीव्र नाराजी
पुढील बातमी
खराब हवामानामुळे विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान

संबंधित बातम्या