सातारा : सातारा तालुक्यातील सासपडे येथील सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा शुक्रवारी दि. १० रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तिचा खून झाला असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण होते. संशयितांच्या घरावर हल्ला करण्यासाठी ग्रामस्थ संतप्त झाले होते. मात्र, अनुचित प्रकार टळला.
संशयास्पद वाटणाऱ्या या घटनेची स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांनी उकल केली. त्यानुसार डोक्याला जबरदस्त मार लागल्याने या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सासपडे गावातील राहुल बबन यादव (वय ३७) यानेच मुलीचा खन केला असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना तिने प्रखर विरोध केल्याने तिचे डोके फरशीवर आपटल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे संपूर्ण सासपडे गावात प्रचंड तणावाचे वातावरण होते.
गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात सातवीत ही मुलगी शिकत होती. शाळेचा पेपर सुटल्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान शेडमध्ये झोपलेल्या वडीलांजवळून घराची चावी घेऊन घरी गेली. तिचे घर शाळेच्या जवळच आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास तिचा भाऊ घरी आला. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. पण मुलगी दिसली नाही. ही बाब त्याने वडीलांच्या कानावर घातली. दोघेही पुन्हा घरी आले. चार खोल्यांचे घर पाहत आत गेले. त्यावेळी शेवटच्या खोलीत न्हाणीशेजारी असलेल्या जात्यावर मुलगी पालथी जखमी अवस्थेत फरशीवर पडलेली आढळली. तिच्या डोक्याच्या मागील बाजूस जखम होऊन रक्तस्त्राव झाल्याचे दिसत होते. तसेच तोंडावर डाव्या बाजूस मार लागून जखमा झालेल्या दिसत होत्या. ही परिस्थिती पाहून तिच्या वडीलांनी तिला उपचारासाठी नेले. परंतु, ती मृत झाली होती.
या घटनेमुळे सासपडे गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बोरगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला. मात्र, आज दि. ११ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयिताचा शोध घेण्यासाठी तपासाची सुरू केला. पोलिसांची तीन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने आणि बोरगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासांच्या आत राहुल बबन यादव या संशयिताला ताब्यात घेतले. तो मुलीच्या घराच्या बाजूलाच राहत आहे. त्याने यापूर्वी २०१५-१६ मध्येही एका अल्पवयीन युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ती मुलगीही गेल्या वर्षी गुढरित्या बेपत्ता झाली होती. नंतर सासपडे शिवारातील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळला होता. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच कालगावात संतापाची लाट उसळली. संशयिताला आमच्या ताब्यात द्या. आमच्यासमोर फाशी द्या, अशी मागणी करत गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचे ठरवले. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांची अतिरिक्त कुमक सासपडे गावात तैनात करण्यात आली. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पण सातारचे पोलीस उपअधीक्षक राजीव नवले , सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर यांनी ग्रामस्थांच्या भावनांना आवर घालत संशयिताला कडक शासन करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी सोपस्कार पार पाडले. सपोनि संदीप वाळवेकर तपास करत आहेत.
तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी
संशयित राहुल यादव याने २०१५- १६ मध्ये गावातीलच एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यात तो जामीनावर बाहेर होता. परंतु, यातील दुर्देवी योगायोग असा की तीच अल्पवयीन मुलगी गेल्यावर्षी गुढरित्या बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह नंतर विहिरीत सापडला होता. हे समजल्यानंतर गावात या मुलीच्या मृत्यू मागेही राहुल हाच असावा अशी चर्चा सासपडे गावात होती. परंतु, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे या घटनेला वाचा फुटली नाही व हा संशयित त्यातून वाचला . परिणामी राहुल मोकाट सुटला . त्यामुळेच त्याचे धाडस वाढले व त्याच प्रकारच्या गुन्ह्यात काल या मुलीचा बळी गेला असा आरोप ग्रामस्थांनी आज आंदोलनावेळी केला. तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.