क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, संघभावनेची निर्मिती

सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 06 February 2025


बारामती : ‘वीज क्षेत्रासारख्या अत्यंत धकाधकीच्या क्षेत्रामध्ये राज्यातील तीन कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी सांघिकता अत्यंत महत्वाची आहे. दरवर्षीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व तेच अभिप्रेत आहे’ असे प्रतिपादन महावितरणच्या कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी केले.

बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलात बुधवारी (दि. ५) राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून जगदाळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार, ज्ञानेश कुलकर्णी, सुनील काकडे, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, ज्ञानदेव पडळकर, धर्मराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भुषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार, आयएसएमटी कंपनीचे किशोर भापकर, विद्या प्रतिष्ठानचे डी. एस. पवार, सहमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. ललीत गायकवाड यांची उपस्थिती होती.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे ११५० महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी बारामती परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी लोककला नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी महावितरणमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतिक वाईकर, अमित जाधव, गुलाबसिंग वसावे, अमोल गवळी, दत्तात्रेय ठाकूर, नीलेश बनकर आदींचा गौरव करण्यात आला. तसेच बारामती परिमंडलातील पाच दिव्यांग कर्मचाऱ्यांना दूचाकी वाहन वितरीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे कार्याध्यक्ष व मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मृदूला शिवदे, रोहित राख, सुशांत कांबळे यांनी केले. या क्रीडा स्पर्धेत २२ क्रीडा प्रकारातील सामने रंगणार असून येत्या शनिवारी (दि. ८) समारोप होणार आहे.

१०० मीटर धावस्पर्धेत मसाणे, अंबादे प्रथम – अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. तर गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांना रौप्यपदक मिळाले. महिला गटात श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) यांनी सुवर्णपदक पटकावले तर मेघा झुणघरे (कल्याण-रत्नागिरी) यांनी रौप्यपदक मिळवले. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
व्हाट्सअप हे दुधारी शस्त्र आहे : प्राचार्य डॉ.अशोक भोईटे
पुढील बातमी
संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच

संबंधित बातम्या