सातारा : साधना प्रकाशनने प्रकाशित केलेल्या व भानू काळे व डॉ. अनिल जोशी यांनी संपादित केलेल्या '१५५ सदाशिव, पेठ सातारा' या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार, दि. २० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात होणार आहे.
साताऱ्यातील लोकविलक्षण दाभोलकर कुटुंबाची कथा या आगळ्यावेगळ्या पुस्तकात मांडण्यात आली आहे. अच्युत व तारा दाभोळकर या दांपत्याला एकूण दहा अपत्ये होती. सात मुले व तीन मुली.हे सर्व कुटुंबीय सातारा येथील १५५ सदाशिव पेठ या घरात लहानाचे मोठे झाले.या भावंडांविषयी व कुटुंबांविषयी त्यांच्या मित्रांनी किंवा आप्तस्वकीयांनी काही लेख लिहिले आहेत. अशा निवडक २८ लेखकांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून '१५५ सदाशिव पेठ सातारा' या शीर्षकाखाली प्रकाशित होत आहे.
पुस्तकाचे प्रकाशन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक उद्योजक सामाजिक कार्यकर्ते दत्ता दामोदर नायक असणार आहेत. यावेळी डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर, शैला दाभोळकर, संपादक भानू काळे, डॉ अनिल जोशी आणि सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाट आणि साधना ट्रस्टचे सचिव हेमंत नाईक नवरे यांनी केले आहे.