लिंगायत महिला भजनी मंडळ, सामाजिक सेवा मंडळातर्फे सातार्‍यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

by Team Satara Today | published on : 17 June 2026


सातारा : लिंगायत धर्मीय गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

लिंगायत महिला भजनी मंडळ, सामाजिक सेवा मंडळ आणि समाजातील विविध कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनत, चिकाटी आणि पालकांचे योगदान यांचेही कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या समाजसेवक तथा मार्गदर्शक प्रकाशराव गवळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेच्या युगात शिक्षण हेच यशाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा सल्ला देत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठी भरारी घेण्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेकायदा वाहतुकीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन; स्वराज क्रांती संघटनेचा इशारा
पुढील बातमी
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन

संबंधित बातम्या