सातारा : नगरपालिका निवडणुकीत भाजपने विजयी सुरुवात केली असून प्रभाग 20 ‘अ’ मधून पक्षाच्या अधिकृत उमेदवार आशा किशोर पंडित या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
दि. 17 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन प्रक्रिया पार पडली. पहाटे पाच वाजेपर्यंत निवडणूक कर्मचारी अर्ज छाननीच्या कामात व्यस्त होते. प्रभाग 20 ‘अ’ मधून आशा पंडित यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज वैध ठरला आणि कोणत्याही विरोधकाचा अर्ज नसल्यामुळे त्या बिनविरोध विजयी झाल्या.
निकाल लागण्यापूर्वीच खाते उघडत भाजपने साताऱ्यात पहिला विजय नोंदवला आहे. या यशानंतर प्रभागात कार्यकर्त्यांनी आशा पंडित यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या उत्साहात विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. भाजपच्या या बिनविरोध विजयामुळे साताऱ्यातील निवडणूक वातावरण अधिक रंगतदार झाले असून पुढील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.