वाई : वाई अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रख्यात लेखक मधुसूदन दिनानाथ नेने ऊर्फ मधु नेने (वय.७४) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सहकार, बँकिंग आणि संत साहित्य या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाने वाई परिसरासह पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मधु नेने यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत वाई अर्बन बँकेत अधिकारी म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. बँकेतील सेवेदरम्यान आणि निवृत्तीनंतरही त्यांनी सहकार चळवळ आणि बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर सखोल लेखन केले. वृत्तपत्रीय पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक तसेच सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. याशिवाय, संत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेल्या नेने यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून वैचारिक व अभ्यासपूर्ण लेखन करून वाचकांमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली होती. सध्या ते सज्जनगड मासिकाचे संपादक होते. वाई येथील वाई अर्बन बँक,लोकमान्य टिळक ग्रंथ संग्रहालय, प्राज्ञ पाठशाळा, मराठी विश्वकोश आदी अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
त्यांच्या पार्थिवावर वाई येथील भीमकुंड आळी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे वाईतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार, सहकार आणि संत साहित्याचे अभ्यासक मधुसूदन नेने (मधु नेने) यांचे निधन
by Team Satara Today | published on : 10 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा