सातारा : महात्मा गांधी जयंतीच्या दिनी पत्रकार परिषद घेऊन सामाजिक कार्यकर्ते हेमंत मोरे यांनी करंजे तर्फ सातारा येथील देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या गोपाळनाथ महाराज देवस्थानची जमीन हडप करण्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून फेरफार रद्द करण्याबरोबर संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी हेमंत मोरे यांनी केली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना मोरे म्हणाले, शहरातील करंजे तर्फ येथील गट नंबर 155 ही मूळची जमीन माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सातारा यांची होती. जानेवारी 1874 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी गोपालनाथ महाराज देवस्थान यांना सनद देऊन वार्षिक 14 रुपये भाडे ठरवले होते. त्यानंतर कालांतराने या जमिनीबाबत न्यायालयामध्ये वादविवाद झाला. ही जमीन देवस्थान इनामाची आहे, हे न्यायालयामध्ये सिद्ध करण्यात आले. या जमिनीवर हक्क सांगणारे सोमगिरी अगर बापूगिरी यांचीही वडिलोपार्जित अथवा स्वकष्टात किंवा कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेली ही जमीन नव्हती, हे सुद्धा न्यायालयाने मान्य केल्याची माहिती मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या जमिनीचा व्यवहार करणार्यांच्या नावे मुंडीत पत्राने कधीही दत्तक घेतल्याचे स्पष्टपणे नमूद केले नाही. सोमगिरी यांनी बापू यांना कधी दत्तक घेतले नव्हते अगर ते वारसही नव्हते. त्यामुळे द्वारकाबाईचा या जमिनीशी कोणताही संबंध शाबित झालेला नाही. तशा पद्धतीने दिवाणी न्यायालयाने निकाल पत्रकात नमूद केले, असाही त्यांनी दावा केला. दिनांक 3 एप्रिल 1997 रोजीच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून भ्रष्ट मार्गाने द्वारकाबाई यांचे नाव फेरफार क्रमांक 23498 ने 7/12 वर चढवण्यात आले. या निकालाबाबत गोपाल विश्वनाथ घोलप यांनी अपील केले.
या जमिनीबाबत विविध फेरफार क्रमांक नुसार बदल करण्यात आला असला तरी दिनांक 25 सप्टेंबर 2003 रोजी संबंधित तलाठी व मंडल अधिकार्यांनी संगनमत करून अपील कालावधी संपण्यापूर्वीच ही नोंद करून घेतली आहे. याबाबतही अपील करण्यात आले. या जमिनीचा मालकी हक्काचा दावा करणार्या द्वारकाबाई बापू गिरीगोसावी यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सुहास उर्फ मनीलाल लक्ष्मण गिरीगोसावी यांनी कुलमुखत्यार पत्र करून घेतले. आर्थिक बळावर याबाबतचे व्यवहार केले. तसेच खोटी माहिती देऊन महसूल विभागाची फसवणूक केली आहे. देवस्थान इनामी वर्ग तीन वगळून वर्ग एक मध्ये रूपांतरित केल्यानंतर या जमिनीचा विक्री व खरेदीचा व्यवहार सुहास गिरीगोसावी, सौ. वैशाली शशिकांत शिंदे व सुनील लक्ष्मीनारायण झंवर या तिघांनी मिळून केला आहे. जमिनीचा व्यवहारच मुळात न्यायालयाचा अवमान आहे. सातारचे जिल्हाधिकारी यांना ही खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.
ही जागा ज्यादा दराने विकसकाला देण्याचा हा डाव असल्यामुळेच हेमंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वे नंबर 155 मधील जमीन जिल्हाधिकारी यांनी ताब्यात घेऊन सर्व फेरफार रद्द करावे व सर्व बनावट गोष्टी करणारे सुहास उर्फ मनीलाल लक्ष्मण गिरीगोसावी यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, असे निवेदन सातारचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
फक्त हा करंजे तर्फ सातारा येथील बनावट व्यवहार नसून जिल्ह्यातील अनेक असहाय्य लोकांचा गैरफायदा घेऊन जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे. वारकरी संप्रदायात वारकरी असल्याचे भासवून गैरव्यवहार झाले आहेत. त्यांसोबतचे फोटो प्रशासकीय अधिकार्यांना दाखवून दबाव टाकण्याचाही प्रकार घडला आहे. याबाबत आता कागदपत्राचे आधारे न्याय निवाडा करावा. स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारे हे बहुरूपी असून शस्त्र बाळगत आहेत. संबंधित जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करून देवस्थानच्या जमिनीची चोरी करणार्या सातार्यातील भोंदू खरात वर सक्त कारवाई करावी, अशी त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीररित्या मागणी केली आहे. संबंधित व्यक्तींनी ज्यांची फसवणूक केली आहे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा हेमंत मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन मोरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप
करंजेतील गट नं. 155 प्रकरणाची चौकशी करून फेरफार रद्द करण्याबरोबर संबंधितांवर फौजदारी कारवाईची हेमंत मोरे यांची मागणी
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा