म्हसवड : राज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात म्हसवड येथील सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने बाजी मारली. तिने सहाय्यक अभियंता श्रेणी एक पदाला गवसणी घातली.
माण तालुक्याने राज्यासह देशाच्या प्रशासनाला अनेक प्रतिभावंत अधिकारी व गुणवंत खेळाडू दिले आहेत. तालुक्याची अधिकारी घडवण्याची हीच परंपरा म्हसवड येथील सुरभी तिवाटणे हिने कायम राखली आहे. सुरभी तिवाटणे हिचे प्राथमिक शिक्षण म्हसवड येथील मेरी माता हायस्कूल व माध्यमिक शिक्षण हायटेक मॉडर्न हायस्कूल, हैदराबाद तर व पुढील शिक्षण एसजीएम कॉलेज, कऱ्हाड येथे झाले.
कराड शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात तिने बी. टेक सिव्हिल पदवी मिळविली. सन २०२३ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेतून तिची नेमणूक जलसंपदा विभाग, कुडाळ येथे सहाय्यक अभियंता श्रेणी दोनमध्ये झाली. त्यानंतर सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेतही तिची निवड सहाय्यक अभियंता श्रेणी एक म्हणून झाली आहे.
या यशाबद्दल तिचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, अभियंता वैशाली आवटे, विजय वाईकर, उपअभियंता एस. जी. पाटील व एस. के. भोपळे, तसेच नितीन चिंचकर, आप्पासाहेब पुकळे, डॉ. राजेश शहा, बाळासाहेब पिसे, तुषार वीरकर, नितीन दोशी, उपायुक्त पल्लवी पाटील, राजेंद्र तेली, मुख्याधिकारी पंडित पाटील, निर्मला राशीनकर- यमगर, उपायुक्त अश्विनी पाटील, अभियंता अमित आडे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, अभियंता चैतन्य देशमाने, देसाई उद्योग समूहाचे अरुण देसाई, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदींनी अभिनंदन केले.