सातारा : सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, शिक्षण आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये निवृत्त पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, सांगोल्याचे आपुलकी प्रतिष्ठान, शाहीर रंगराव पाटील, ओमप्रकाश तथा काका कोयटे, पुण्यातील 'काका हलवाई'चे युवराज गाडवे, संदेशकुमार नवले आदींचा समावेश आहे.
गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. भारतीय वायुसेना व पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावताना साहित्यात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अनिल पाटील यांना गुंफण साहित्य पुरस्कार, गरीब - गरजू लोकांच्या प्रसंगाला मदतीसाठी धावून जाणाऱ्या सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानला गुंफण सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेली चार दशके शाहिरीच्या माध्यमातून इतिहासाचा जागर करत प्रबोधनाची पताका फडकवत ठेवणारे महाराष्ट्र शाहीर परिषद व कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे कोषाध्यक्ष शाहीर रंगराव पाटील यांना गुंफण सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील सोळा हजारहून अधिक पतसंस्थांचे नेतृत्व करणाऱ्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची गुंफण सहकार भूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुण्यातील नामांकित काका हलवाई ब्रँडचा लौकिक जपणारे युवराज गाडवे यांना गुंफण उद्योगरत्न पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्यातील जेएसपीएम युनिव्हर्सिटीतील प्रा. डॉ. विजयंता भुरले यांना गुंफण शिक्षणरत्न पुरस्कार, विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सद्भाव तळमळीने जपणारे पिंपळे गुरव येथील राजीव गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक संदेशकुमार नवले यांना गुंफण सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १५ फेब्रुवारी रोजी पुण्यात होत असलेल्या २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. चेणगे यांनी सांगितले.