संस्कृती परंपरा टिकाव्यात यासाठी विश्वरूपिणी ग्रुपने शेकडो महिलांना दिले मंगळागौरीच्या खेळाचे मोफत प्रशिक्षण

by Team Satara Today | published on : 06 September 2026


सातारा : सध्या डॉल्बीच्या विरोधाच्या विषयामुळे का असेना, पण लोकांच्या चर्चेत आपल्या जुन्या परंपरा, संस्कृती आणि पारंपरिक खेळ यांची चर्चा सर्वत्र रंगते आहे. पण सोशल मिडीयाच्या अति आहारी गेलेली आत्ताची पिढी आपल्या संस्कृती आणि परंपरा यापासून दूर गेली आहे. या पिढीला पुन्हा आपल्या पारंपरिक खेळाची आठवण करून देण्याबरोबरच, त्यांना हे खेळ मोफत शिकवण्याचे काम आज साताऱ्यातील विश्वरूपिणी ग्रुपने केले.
खेळ खेळूया मंगळागौरीचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वरूपिणी ग्रुप सातारा यांनी आज साताऱ्यातील शंभर पेक्षा अधिक महिलांना मोफत मंगळागौरीच्या खेळाचे प्रशिक्षण दिले. हा कार्यक्रम सौ प्रेरणा धुमाळ यांच्या यशस्विनी महिला समूहाने आयोजित केला होता. तसेच याच ठिकाणी मोदक स्पर्धेचे देखील आयोजन केले होते. या स्पर्धेच्या परीक्षक विश्वरूपिणी ग्रुपच्या संस्थापिका सौ. अनघा अभय परांजपे या होत्या.
उत्कृष्ट मंगळागौर खेळणाऱ्या महिला, उत्कृष्ट वेशभूषा अशा स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. विश्वरूपिणी ग्रुप हा पारंपरिक खेळ, नृत्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळेच काही कालावधीतच नावारूपाला आलेला असा साताऱ्यातील ग्रुप आहे. महिलांना मंगळागौरीचे खेळ मोफत शिकवण्याचा हा उपक्रम पार पाडण्यासाठी विश्वरूपिणी महिला ग्रुपच्या संस्थापिका अनघा परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सख्या अनिता द्रविड, वैशाली पाचवडकर ,शिल्पा जंगम ,शितल शहा ,साधना फडतरे, अनुजा कुलकर्णी, निवेदिता मुळे, अर्पिता नाडगौडा पौर्णिमा गुरव, तुलसी इनामदार, आदिती पाठक या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बालगृहातून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
पुढील बातमी
धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू, मॅरेथॉनवर शोककळा

संबंधित बातम्या