सातारा : कोंडवे (ता. सातारा) येथील स्वामी विवेकानंदनगर परिसरात दुचाकीस्वाराला मारहाण करून बुलेटसह साहित्य लुटणाऱ्या तीन आरोपींना सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
केवल सत्यवान जाधव (वय २८, रा. केसरकर पेठ), विनायक राजाराम पोद्दार (वय २५, रा. शिवाजी चौक, इस्लामपूर, जि. सांगली) आणि प्रणाली गजानन गंगावणे (वय २७, रा. शनिवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
१० एप्रिल रोजी मेढा (ता. जावळी) येथील शशिकांत गोरे हे दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली व बुलेट, मोबाईल चार्जर आणि बॅग असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लुटला होता.
पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर व पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना कोंडवे येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस हवालदार महेश गायकवाड, राजू शिखरे, तेजा तुपे, सचिन झनकर आदींनी सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.