साताऱ्यात ऑगस्ट क्रांती दिनी 'क्रांती स्तंभा'ला टाळे; प्रशासनाची आणि स्मारक कमिटीची दांडी, मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी राखली अब्रू

by Team Satara Today | published on : 09 August 2026


सातारा : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त साताऱ्यात अत्यंत संतापजनक आणि उदासीन प्रकार समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि प्रशासकीय इमारतीच्या मध्यभागी असणाऱ्या 'क्रांती स्तंभा'च्या मुख्य प्रवेशद्वाराला सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुलूप ठोकण्यात आले होते. त्यामुळे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना तब्बल १० वाजेपर्यंत बाहेरच ताटकळत उभे राहावे लागले. अखेर १० वाजता गेट उघडल्यानंतर कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ करून क्रांती स्तंभाची अब्रू राखत अभिवादन केले.

​९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी 'करो या मरो'चा नारा देऊन 'भारत छोडो' आंदोलनाची सुरुवात केली होती. साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या 'प्रतिसरकार'चा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि अज्ञात हुतात्म्यांच्या स्मरणाणार्थ साताऱ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष करून हा 'क्रांती स्तंभ' उभारला होता. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रशासन आणि ज्या कमिटीने याच्या उभारणीसाठी प्रयत्न केले, त्यांनाच आज या दिवसाचा विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

​आज ऑगस्ट क्रांती दिनाचे गांभीर्य विसरून क्रांती स्तंभाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि कमिटीच्या सदस्यांनी दाखवलेल्या आळशीपणाबद्दल सर्वस्तरातून तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे. सकाळी ६ वाजल्यापासून स्तंभाला टाळे असल्याने शासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींनी याकडे फिरकणेही पसंत केले नाही.

​अशा परिस्थितीत, जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सकाळीच क्रांती स्तंभाजवळ एकत्र आले. उशिरा जाग आलेल्या प्रशासनाच्या आळशीपणावर मात करत, १० वाजता गेट उघडल्यानंतर या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम क्रांती स्तंभ परिसराची स्वच्छता केली. परिसर स्वच्छ करून पुष्पचक्र अर्पण करत कार्यकर्त्यांनी क्रांतीच्या स्मृती जागवल्या आणि कमिटीने दाखवलेल्या अनादराला गांधीगिरीने उत्तर दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेची नजर; लवकरच विशेष तपासणी मोहीम
पुढील बातमी
बावडा येथील शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार यांना साखर उद्योग संशोधनासाठी मानाचा पुरस्कार

संबंधित बातम्या