सातारा : सातारा शहर परिसरात दुचाकीवरुन गांजा हा अंमली पदार्थ अवैधरित्या घेवून जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) एकाला जेरबंद केले आहे.
अतुल धनाजी भगत (वय 27, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.14 मे रोजी एलसीबीच्या पथकाला सातार्यात गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. दुचाकी क्रमांक एमएच.11 डीसी 8278 वरुन संशयित जाणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन सातारा शहरात सापळा लावला. संंबंधित दुचाकी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यावरील चालकाला थांबवले. दुचाकीवर बांधून ठेवलेले पोते होते. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली असता संशयिताने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोत्यामध्ये पाहिले असता त्यात गांजा होता. याची बाजारभावाप्रमाणे किंमत 2 लाख 65 हजार 500 रुपये होत आहे. पोलिसांनी दुचाकी, गांजा जप्त करुन संशयिताला ताब्यात घेतले.
सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून गांजा, गांजाची झाडे व अफूची झाडे अशा एकूण 44 कारवाई करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 कोटी 39 लाख 33 हजार 170 रुपये किंमतीचा 1067.129 किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, विशाल पवार, सचिन ससाणे या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.