पाईपलाईनच्या वादातून फलटण तालुक्यात रक्तरंजित थरार; साठेगावात तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला, आठ जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 31 October 2026


फलटण : पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवरून झालेल्या वादातून फलटण तालुक्यातील साठेगाव येथे एका तरुणावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेच्या मुळाशी बेसुमार सुरू असलेला अवैध माती उपसा असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
साठेगावच्या हद्दीतून जाणाऱ्या वाजेगाव ते बारामती मार्गावरून सरडे गावातील काही ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर माती व वाळूची अवजड वाहतूक सुरू आहे. या अवजड वाहनांमुळे साठेगावाला पिण्याचे पाणी पुरवणारी मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने गावाचा पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत होता. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी यापूर्वी फलटणच्या तहसीलदारांकडे रीतसर तक्रार अर्ज देऊन दाद मागितली होती. मात्र, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष खदखदत होता.
दरम्यान, नेहमीप्रमाणे सकाळी अवजड वाहने जात असताना ग्रामस्थांनी रस्त्यावर उभे राहून संबंधित ठेकेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना अडवले. या मार्गाने वाहने नेऊ नका, अशी विनंती करून समजावून सांगण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत होते. मात्र, ठेकेदाराच्या समर्थकांनी कोणतीही चर्चा न ऐकता ग्रामस्थांशी हुज्जत घालत थेट शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि ठेकेदाराच्या टोळक्याने ग्रामस्थांवर हात उगारला.
हा वाद विकोपास जात असल्याचे पाहून भांडण मिटवण्यासाठी पुढे गेलेल्या सुनील वसंत बगाडे यांच्यावर टोळक्याने थेट हल्ला चढवला. बापूराव चव्हाण, अविष्कार ऊर्फ गझनी भोसले, शुभम रिटे, मयूर खाडे, अजय सोनावणे, गौरव भोसले (सर्व राहणार सरडे) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी सुनील बगाडे यांना घेरले. शिवीगाळ करत असतानाच या टोळक्यातील एकाने कमरेचा तीक्ष्ण चाकू काढून बगाडे यांच्या पाठीत डाव्या बाजूला सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बगाडे यांना पाहून गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने रक्तबंबाळ अवस्थेतील सुनील बगाडे यांना फलटण येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या गंभीर घटनेनंतर सुनील बगाडे यांनी दिलेल्या जबाबावरून फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, वरकरणी ही घटना पाईपलाईन फुटल्याच्या वादातून घडलेली दिसत असली, तरी या संघर्षाच्या मुळाशी सरडे आणि साठेगाव परिसरातील बेसुमार आणि अनिर्बंध अवैध माती उपसा कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. गेले कित्येक दिवस या भागात माती उपशाच्या वर्चस्वावरून पडद्यामागे तणाव धुमसत असून, त्यातूनच अधूनमधून अशा हिंसक चकमकी घडत आहेत. स्थानिक पोलिसांनी केवळ मारहाणीपुरता तपास मर्यादित न ठेवता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कसून चौकशी केल्यास, फलटण परिसरातील मोठे अवैध माती उपसा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यातील संभाव्य टोळीयुद्ध आणि गंभीर गुन्हेगारी रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने या भागातील अवैध उपशावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शंभूराज देसाईंना कोयनेतील पाणी अडविण्याचा अधिकार कुणी दिला ?; सांगलीतील बैठकीत खासदार, आमदारांचा संतप्त सवाल
पुढील बातमी
वाठार किरोलीत पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घूण खून; एका संशयितास अटक, खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या