लेखकांनी स्वातंत्र्याचे भान जोपासावे - किशोर बेडकिहाळ; संबोधी प्रतिष्ठानचा बोरगावकर स्मृती साहित्य पुरस्कार सोहळा उत्साहात

by Team Satara Today | published on : 27 April 2026


सातारा : आत्ताचा काळ लेखकांनी स्वातंत्र्याचे भान  जोपासण्याचा व आत्मपरीक्षण करण्याचा आहे.  मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी निर्भीडपणे लेखन करावे,  असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने 'प्रबुद्ध भारत 'चे साहित्यिक सुधाकर यशवंत बोरगावकर स्मृती राज्यस्तरीय कथासंग्रह पुरस्कार किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे, व्यासंगी  अभ्यासक, समीक्षक डॉ.गजानन अपिने(पुणे ), संबोधी  प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे, अध्यक्ष रमेश इंजे, उपाध्यक्ष  प्रा.प्रशांत साळवे, विश्वस्त डॉ.जयपाल सावंत उपस्थित होते.

किशोर बेडकिहाळ म्हणाले, सर्जनशील लेखक वैश्विक व स्थानिकही असतो. तो संवेदनशील असला पाहिजे.त्याला माणूस वाचता आला पाहिजे. त्याने नवनवीन प्रश्नाला भिडून मानवी मूल्ये व  विवेकाची जोपासणा करण्याची गरज आहे.

प्रमोद मनोहर कोपर्डे  म्हणाले, लेखकाने मानवी संबंधाची खोली आणि अवकाश याबरोबरच आपल्या संपूर्ण लेखनात कार्यकारण भाव जोपासला पाहिजे. स्त्री-पुरुष संबंधाचे चित्रण करताना स्त्री लेखिकांनी अतिशय मोकळेपणे व परखडपणे मांडणी करण्यास धजावले पाहिजे.

कथासंग्रह स्पर्धेचे परीक्षक डॉ.गजानन अपिने यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विभागातील प्राप्त झालेल्या व विजेत्या ठरलेल्या कथासंग्रहाचे वैशिष्ट्यांचे यावेळी अतिशय सखोलपणे   मूल्यमापन विशद  केले.  जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद साहित्यात उमटत असल्याचे सांगितले.

कथासंग्रह स्पर्धेतील विजेते व मान्यवरांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ' शिवाजी कोण होता?' हे पुस्तक व भारतीय संविधान उद्देशिका स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रथम क्रमांक :' तो स्पर्श' -कविता पाचंग्रे- खरात (शिरुर, पुणे ) द्वितीय क्रमांक : ' तू ही गोष्ट सांगायला नको होती!'- सुनील साळुंके ( डोंबिवली, मुंबई ) तृतीय क्रमांक :' भुईकोर'- गोपाल शिरपूरकर ( चंद्रपूर ), उत्तेजनार्थ :' सारीपाट '- अलका मोकाशी (नागपूर ) व कथाकार प्रदीपकुमार कांबळे - बहेकर (पुणे ) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते ' कडेवर आणि इतर कथा ' - महेश सोवनी ( भिवंडी, ठाणे)  परीक्षामुळे येऊ शकले नाहीत. त्यांना व इतर सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र पाठवण्यात येणार असल्याचे निमंत्रक दिनकर झिंब्रे यांनी सांगितले व 

आकर्षक सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तयार करणारे   पुणे येथील कलावंत अतुल घाटगे तसेच भारती बाबासाहेब सावंत (जयसिंगपूर )व मंजिरी अरुण दुधगावकर( पुणे ) सुधाकर बोरगावकर यांची नात  डॉ. मनाली नरेंद्र बोरगावकर एमडी आयुर्वेद झाल्याबद्दल तसेच चिरंजीव इंजिनियर महेंद्र बोरगावकर   यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

दिनकर झिंब्रे यांनी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार योजनेची माहिती दिली व  चालू वर्षात  कादंबरी वाङ्मय प्रकारावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयपाल सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास संबोधी  प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विश्वस्त,कार्यकर्ते अशोक कांबळे, 'जातपीळ' कादंबरीकार जयवंत भिसे, अशोक भोसले, अनिल वीर, अजित जगताप  तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उन्हाळी हंगामासाठी सातारा विभागातून एसटीच्या जादा फेऱ्या; प्रवाशांनी जादा बसेसचा लाभ घ्यावा - विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड
पुढील बातमी
मराठी भाषा मातृवत प्रेमाचा अखंड झरा : यशेंद्र क्षीरसागर; औंध येथील भवानी बाल विद्यामंदिरामध्ये बालकांशी संवाद

संबंधित बातम्या