सातारा : राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींचा दौरा श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने यावर्षी अकोला, बुलढाणा, नागपूर येथे यशस्वीपणे गेली दोन महिने पूर्ण करण्यात आला. त्यानंतर या पादुका समर्थ भक्तांसोबत पुणे मार्गे शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सातारा येथे आणण्यात आल्या. शिवसमर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहुनगरीत पादुकांचे स्वागत करण्यात आले.
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड व श्री समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळ सातारा यांचे वतीने शिवतीर्थ, पोवई नाका येथे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे स्वागतासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसमर्थ भक्त व वारकरी संप्रदायांच्या शेकडो वारकरी मंडळींच्या वतीने या या समर्थ पादुकांचे स्वागत व पूजन करण्यात आले.
पोवईनाका येथे शिवतीर्थावर मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यावर समर्थ पादुकांचे स्वागत सुवासिनींनी पंचारतींनी केले. फुलांनी व विद्युत रोषणाईने सुशोधित केलेल्या श्री राम व सीतेच्या मूर्ती पुढे या समर्थांच्या दोन पादुका समर्थभक्त योगेशबुवा रामदासी व ज्येष्ठ समर्थ भक्त विद्याधरबुवा वैशंपायन यांनी ठेवल्यानंतर या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणूक मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य रांगोळ्या लक्षवेधक ठरत होत्या. श्रीराम हलगी ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेले हलगी वादन विशेष लक्षवेधी ठरत होते. स्वागतानंतर निघालेल्या मिरवणुकीत आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर, हिंदवी पब्लिक स्कूल आणि नवीन मराठी शाळेच्या छोट्या मुला -मुलींनी सादर केलेले चित्ररथावरील बाल समर्थ, वेण्णा स्वामी अक्कास्वामी ,छत्रपती शिवाजी महाराज व समर्थांच्या परंपरेतील अनेक शिष्य हे भगव्या वेशात सर्वसाताकरांचे आकर्षण ठरले होते. मिरवणुकीत आंबेघर -मेढा येथील बाल वारकऱ्यांचे वारकरी संप्रदायाचे चक्रीभजन विशेष लक्ष वेधणारे होते. वारकरी दिंडी सोबत ही मिरवणूक पोवई नाका येथून सुरू होऊन मल्हार पेठ, शेटे चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती चौकात येऊन त्यानंतर गांधी मैदान राजवाडा येथे आल्यावर पादुकाचे यथोचित स्वागत आणि पूजन करण्यात आले.
गांधी मैदानावर भव्य मंडप उभारून या ठिकाणी समर्थ पादुका सातारकरांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी विविध रंगाच्या महारांगोळ्या विशेष लक्षवेधी ठरत होत्या. पादुकांचे स्वागतासाठी समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ. अच्युतराव गोडबोले,कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, श्री रामदास स्वामी भक्त मंडळचे कार्याध्यक्ष रंगराव जाधव, अध्यक्ष लक्ष्मण भंडारे, उपाध्यक्ष नारायण खरे यांचे सह श्री समर्थ विद्यापीठाचे कुलपती समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर रामदासी, समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, अशोक गोडबोले, कल्पना ताडे, रमण वेलणकर, मधुकर बाजी, सुनील कुलकर्णी, श्रीमती अनघा देसाई, मोहन साठे, भास्कर मेहेंदळे, रंजन गोडबोले, अभय गोडबोले, वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.बबनराव सापते, संतोष वाघ, यावेळी श्रीकांत शेटे, केदार नाईक, गजाननराव बोबडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, राम हादगे, विलास चव्हाण सातारचे बाळासाहेब ठाकरे रूपातील भगवानराव शेवडे यांची उपस्थिती होती.