महाबळेश्वर : तालुक्यात सुरू असलेल्या खैर लाकडाच्या अवैध तस्करीविरोधात वनविभागाने कडक पाऊल उचलत रात्रगस्तीदरम्यान मोठी कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाला गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तत्काळ सापळा रचून दोन वाहनांची तपासणी करण्यात आली. यात महिंद्रा पिकअप आणि स्कॉर्पिओमधून खैर प्रजातीचे मौल्यवान लाकूड अवैधरित्या नेले जात असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत दोन्ही वाहने तसेच लाकूड ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान संतोष पांडुरंग पार्टे आणि समीर संतोष पार्टे (रा. केळघर, ता. जावळी) यांना पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही मोहीम उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ आणि वन परिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणामागे मोठे तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत असून त्यादृष्टीने तपासाची दिशा ठरवण्यात येत आहे. वनसंपत्तीची हानी रोखण्यासाठी अशा धडक कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
कारवाईतील ठळक बाबी
दोन वाहने जप्त (महिंद्रा पिकअप, स्कॉर्पिओ)
खैर लाकूड जप्त - एकूण मुद्देमाल सुमारे ₹5.50 लाख
दोन आरोपी ताब्यात (केळघर, ता. जावळी)
पुढील तपास सुरू, मोठ्या जाळ्याचा संशय