सातारा : दिग्गज साहित्यिकांचे कसदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवून त्यांची अभिरुची जपणाऱ्या गुंफण दिवाळी अंकाला मुंबई येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघ या नामवंत संस्थेने घेतलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत उल्लेखनीय दिवाळी अंकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
सातारा जिल्ह्यातून गेली तीन दशके प्रकाशित होणाऱ्या व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात वाचकप्रिय ठरलेल्या गुंफणला उत्कृष्ट निर्मितीबद्दल राज्य- आंतरराज्य स्पर्धेत पारितोषिके मिळण्याचे हे सलग २३ वे वर्ष आहे. दर्जेदार साहित्य, उत्तम मांडणी व सजावट यात गुंफणने नेहमीच आपले वेगळेपण जपले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई देशमुख या यंदाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाच्या मानकरी आहेत. अशा सर्वच आघाड्यांवर सर्वांगसुंदर ठरलेल्या गुंफणच्या उत्कृष्टतेवर मोहर उमटवत मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेने यंदाच्या गुंफणला उल्लेखनीय दिवाळी अंकाचा पुरस्कार जाहीर केला आहे, अशी माहिती गुंफणचे संपादक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या उपक्रमाचे हे ४९ वे वर्ष आहे. स्पर्धेसाठी मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इंदूर, शिकागो, सिंगापूर येथून एकूण १७३ दिवाळी अंक आले होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा गौरवदिनानिमित्त गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरु हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात गुंफणला हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.