सातारा : धर्मादाय रुग्णालयांमध्ये त्यांच्या एकूण कार्यान्वीत खाटांपैकी 10 टक्के निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व 10 टक्के खटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे. याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये जावून तपासणी करावी, असे निर्देश ग्रामविकस व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
धर्मादय रुग्णालय जिल्हास्तरीय समिती त्रैमासिक बैठक मंत्री गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनाय काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मिल्लाकर्जुन माने, सहायक धर्मादाय आयुक्त सरोजनी मांजेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, डॉ. संदीप श्रोती, गेणश मेळावणे, डॉ. सुनिता पवार आदी उपस्थित होते.
निर्धन व दुर्बल संवर्गातील रुग्णांवर आवश्यक व दर्जेदार उपचार होण्यासाठी ही याजना अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, धर्मादाय अंतर्गत नोंदी असलेल्या रुग्णालयांना शासन अनेक सवलती देते. त्यामुळे रुग्णांसाठी सदर निषांतर्गत आरक्षित खाटा त्यांना पारदर्शकपणे उपलब्ध करुन देण्याच्या योजनेची प्रभावी अंमबजावणी आवश्यक आहे. तसेच शासनास अपेक्षित असलेल्या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना लाभ होईल. त्यामुळे जिल्ह्यातील एकही रुग्ण सवलतींच्या खाटांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
सातारा जिल्ह्यात धर्मादाय अंतर्गत 16 रुग्णालये कार्यरत आहेत. नाव्हेंबर 2024 पासून आत्तापर्यंत 1 हजार 721 रुग्णांना लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यात 151 खाटा निर्धन तर 151 खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.
धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा नियमानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपलब्ध करून देणे, धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या रुग्णखाटांची, आरक्षित रुग्णखाटांपैकी उपलब्ध व रिक्त खाटांची तसेच कोणत्या रुग्णालयात कोणत्या आजारावरील उपचाराची सुविधा उपलब्ध आहे याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी. यामुळे गरजु रुग्णांना याचा लाभ घेता येईल व योजनेचा उद्देश पूर्ण होईल, असेही मंत्री श्री. गोरे यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, धर्मादाय रुग्णालय असल्याबाबतचा फलक प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावला पाहिजे याची दक्षता घ्या. या रुग्णालयांमध्ये अनेकदा खाट शिल्लक नसल्याचे सांगितले जाते, ही गंभीर बाब असून हे टाळण्यासाठी धर्मादाय रुग्णलयाचे या विषयाबाबतचे कामकाज ऑनलाईनच झाले पाहिजे. शासनाच्या डॅशबोर्डवर किती रुग्णांवर उपचार केले, किती खाटा शिल्लक आहेत याची रोजच्या रोज माहिती भरली गेली पाहिजे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकासाठी असणाऱ्या खाटा, उपचार सवलत यांची माहिती व्हावी यासाठी शासनाने डिजीटल प्लॅटफॉर्म उपलब्ध दिला आहे. charitymedicalhelpdesk. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्याची माहिती उपलब्ध होते. हा सर्व कारभार पारदर्शीपणे चालवण्यासाठी या अंतर्गत होणारे काम हे ऑनलाईन असले पाहिजे. सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही धर्मादाय रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी केल्या.