सातारा : महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात महसूल विभागामार्फत मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते खुले करण्यात आले. शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना शेतशिवार व गावातील मार्गांचा सुलभतेने उपयोग करता यावा, यासाठी तहसीलदार व महसूल कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करून ही मोहीम राबविण्यात आली.
अनेक वेळा खुले करण्यात आलेले पाणंद रस्ते कालांतराने पुन्हा अतिक्रमणाखाली जात असल्याचे आढळते. तसेच, कोणते रस्ते खुले करण्यात आले आहेत, ते किती अंतरापर्यंत खुले आहेत, याबाबत नकाशा-आधारित माहिती उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत असत. सदर बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून सातारा जिल्ह्यातील खुले करण्यात आलेले पाणंद रस्ते GIS प्रणालीवर नोंदविण्यात आले आहेत. आतापर्यंत 470 पेक्षा जास्त खुले करण्यात आलेले रस्ते GIS वर मॅप करण्यात आले आहेत.
सदर कार्यासाठी कोणत्याही बाह्य यंत्रणेची मदत न घेता, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून व कोणताही अतिरिक्त खर्च न करता हे काम पूर्ण केलेले आहे.
या उपक्रमामुळे – जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व खुले पाणंद रस्ते नकाशावर पाहण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध झाली आहे.भविष्यात रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांचे निदान व पडताळणी करणे सुलभ होणार आहे.महसूल विभागाच्या कार्यात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
सदर GIS नकाशे सातारा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.satara.gov.in उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या तालुक्यातील व गावातील खुले करण्यात आलेले पाणंद रस्ते पाहण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.