सातारा : वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकर्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी सातार्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीतून केलेली प्रतीकात्मक एंट्री. इंधनाच्या वाढत्या किंमतींविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी हा अनोखा आंदोलनात्मक प्रयोग करण्यात आला. सामान्य जनतेचे जगणे महागाईमुळे कठीण झाले आहे, असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
शहरातील विविध भागांतून निघालेला मोर्चा घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महागाईला आळा घाला, शेतकर्यांना मदत द्या, पेपरफुटी रोखा, महिलांना सुरक्षा द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही कार्यकर्ते रस्त्यावर बसल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आणि वाहनांच्या रांगा लागल्या.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. शशिकांत शिंदे यांच्यासह काही पदाधिकार्यांना पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलन अधिकच आक्रमक झाले.
यावेळी शशिकांत शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, राज्यातील नागरिक महागाई, बेरोजगारी आणि अन्य समस्यांनी त्रस्त आहेत. शेतकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांबाबत शासन गांभीर्याने निर्णय घेत नाही. त्यामुळे जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.