वेखंडवाडी झाली आता संभाजीनगर

जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे शिक्‍कामोर्तब

सातारा  : तारळे विभागातील वेखंडवाडी या गावाचे नाव आता संभाजीनगर असे झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच यावर शिक्‍कामोर्तब करून तसे पत्र सर्व शासकीय कार्यालयांना दिले आहे. गेली अनेक वर्षे येथील कारभारी व ग्रामस्थांची अखंड धडपड चालली होती. त्यांच्या प्रयत्नाला अंतिमतः यश मिळाले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर अंतिम हात फिरवल्‍याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, केलेल्‍या धडपडीचे चीज झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

आजूबाजूला अनेक वाड्या आपणास पाहायला मिळतात. काही वाड्या या आडनावावरून देखील पडल्या आहेत. वर्षानुवर्षे त्या त्याच नावाने ओळखत आल्या आहेत.

वाडी म्हणजे शे- पाचशे लोकांची वस्ती असे साधारण चित्र असते. मात्र, काही वाड्या या हजार ते तीन हजार लोकसंख्येपर्यंत वाढलेल्या असतात. मग त्यांना वाडी कसे म्हणायचे? आजच्या आधुनिक युगात रोटी बेटी व्यवहार करताना वाडीत कसे करायचे, असाही सूर समाजात दिसतो. यातून या वाडीतील रहिवाशांना विशेष त्रास होतो; पण तो त्रास म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो.

दहा- बारा वर्षांपूर्वीपर्यंत वाडी नावाने असणाऱ्या गावचे काही विशेष महत्त्व नव्हते; पण शाळा, कॉलेज, कामधंद्यानिमित्त लोक गावाबाहेर पडू लागले. पूर्वी डोंगरावर किंवा नावाने वाडी असणाऱ्या गावात रोटीबेटी व्यवहार होत होता; पण गेल्या काही वर्षांपासून वाडी नावाच्या गावात रोटीबेटी व्यवहार करताना मुलीकडचे लोक उघडपणे वाडीत सोयरीक जुळविण्यात टाळाटाळ करू लागले. यासह अनेक कारणांनी लोकांना गावाचे नाव बदलण्याची गरज वाटू लागली.

असे असले तरी नाव बदलण्याची किचकट व जटिल प्रक्रिया पाहता कोण नाव बदलण्यासाठी पुढाकार घेत नाही. मग एखादीच वेखंडवाडी त्यासाठी पुढाकार घेते आणि फक्त पुढाकारच घेत नाही, तर नाव बदलूनच थांबते. ग्रामपंचायत ते दिल्ली अशा दीर्घ नामकरणाच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यांवर गावकरी एकीने पुढे गेले. सरतेशेवटी नाव बदलूनच थांबले. यासाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे व अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

तारळे विभागात काहींनी शासकीय अनुभव लक्षात घेता केवळ गावाच्या पाट्या बदलल्या. भुडकेवाडी गावाने मोरगाव, धनगरवाडीने हनुमाननगर, दुटाळवाडीने रायगाव. मात्र, वेखंडवाडीने नाव बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. तो प्रस्ताव मंजूर झाला असून, संभाजीनगर असे गावाच्‍या नामकरणास मंजुरी मिळाली. दिल्ली ते मुंबई आणि आता जिल्हाधिकारी सातारा असा प्रवास करत नव्या नावावर मोहोर उमटवली आहे.

मागील बातमी
पॅरासिटामॉलचे अधिक सेवनाने आरोग्यावर होतो वाईट दुष्परिणाम
पुढील बातमी
बांगलादेशाचा पुन्हा कांगावा

संबंधित बातम्या