सैदापूर येथे चारजणांना मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा; मंगळसूत्र, मोबाईल काढून घेतल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 29 September 2026


सातारा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून घरासमोर येत शिवीगाळ व दमदाटी करत 42 वर्षीय महिलेसह तिचे पती, मुलगा आणि भावजय यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना सैदापूर येथे दि. 27 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यावेळी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, निर्मला दिलीप उंबरकर, सागर दिलीप उंबरकर, सुरज दिलीप उंबरकर (सर्व रा. सैदापूर), नरेश सुनार (रा. शुक्रवार पेठ), भोपाल घाडगे (रा. सैदापूर) आणि प्रेम यादव (रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या घरासमोर येत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादीचे पती रमेश यांच्या पायावर आणि ओठाच्या वरच्या बाजूस कोयत्याने मारून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी एका संशयिताने हातातील कोयत्याने मुलाच्या डाव्या बाजूला छातीखाली वार करून त्याला जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील पिवळ्या धातूचे मंगळसूत्र आणि त्यांचे पती यांचा मोबाईल काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुन्या वादातून एकास मारहाण; दोनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
सैदापूर परिसरात उधारीवर सिगारेट न दिल्याने महिलेचा विनयभंग; मारहाणीत दोघे जखमी

संबंधित बातम्या