गोडोलीतील संशयास्पद मृत्यूने खळबळ; घातपाताचा संशय, पोलीस तपास सुरू

by Team Satara Today | published on : 23 May 2026


सातारा : गोडोली येथील भैरवनाथ मंदिरालगत असलेल्या श्री. छ. प्रतापसिंहराजे भोसले व्यासपीठाच्या कोपऱ्यात एका युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने शनिवारी सकाळी परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशांत उर्फ गुड्या यशवंत ससाणे (वय २७, रा. कामाठीपुरा) असे मृत युवकाचे नाव असून, त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सातारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोडोली चौकातील भैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या सभागृहाच्या कोपऱ्यात सकाळच्या सुमारास एक तरुण झोपलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांना दिसला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या बाजूला रक्ताचा थारोळा आढळून आल्याने तातडीने सातारा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, एपीआय अनंत कांबळे आणि त्यांच्या पथकाने धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासादरम्यान मृत युवक हा कामाठीपुरा येथील प्रशांत उर्फ गुड्या ससाणे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मामाला घटनेची माहिती दिली.

दरम्यान, घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी संबंधित कॅमेरे बंद असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे नेमकी घटना कशी घडली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. घटना घडलेला परिसर हा रात्री उशिरापर्यंत वर्दळीचा असतो. काही टवाळखोर तेथे नियमित बसत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. घटना नेमकी रात्री घडली की पहाटे, ती प्रत्यक्ष कोणी पाहिली का, याबाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण असल्याची चर्चा सुरू होती. मृतदेहाशेजारी पडलेला रक्ताचा सडा आणि त्यामागील नेमके कारण याचा शोध पोलीस घेत आहेत.

प्रशांत उर्फ गुड्या ससाणे हा आई-वडील आणि दिव्यांग बहिणीसोबत राहत होता. तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मृत्यूची माहिती दुपारपर्यंत घरच्यांना नव्हती. पोलिसांनी केवळ त्याच्या मामाला याबाबत कळवले होते. गुड्या हा मनमिळावू स्वभावाचा असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. मात्र, त्याच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा - सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे आवाहन, आवाहनास मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रतिसाद
पुढील बातमी
कोरेगावातील सुभाषनगरमधील बोगस कॉल सेंटर उध्वस्त; १७ जणांवर पोलिसांची कारवाई, चालत होते अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’

संबंधित बातम्या