मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यात भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या यादीत नाव नसलेल्या आणि दुसऱ्या यादीसाठी वेटींगवर ठेवण्यात आलेल्या 16 विद्यमान आमदारांची धाकधूक आता वाढली आहे. त्यामुळे वेटींगवर असलेल्या आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रिघ लागली आहे.
उमेदवारी मिळण्यात अनिश्चितता असल्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार आता दुसऱ्या यादीत आपले नाव असावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाने पाच दिवसांनी आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. या यादीत एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट करत ८९ जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर ४ विद्यमान आमदारांऐवजी त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली.
भाजपाने पहिली यादी जाहीर करताना पेण मतदारासंघातून रवीशेठ पाटील, पुणे खडकवासला येथून भीमराव तापकीर, कंटोंटमेंट मतदारसंघातून सुनील कांबळे, पंढरपूर येथून समाधान आवताडे, माळशिरस येथून राम सातपुते, अकोट येथून प्रकाश भारसाकळे, मुर्तिजापूर येथून हरिष पिंपळे, वाशिम येथून लखन मलिक या आमदारांना वेटींगवर ठेवले आहे. यापैकी आता काही आमदारांकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना गळ घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे सोमवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहचले. यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधातील भाजपचे इच्छुक उमेदवार बाळा भेगडे हेदेखील फडणवीसांच्या भेटीसाठी पोहचले.