कडेकोट बंदोबस्तात शिवकालीन वाघनखं नागपूरकडे रवाना

सातारा : तब्बल 7 महिने शिवभक्तांच्या साक्षीने साताऱ्यात प्रदर्शित करण्यात आलेली ऐतिहासिक शिवकालीन वाघनखे अखेर नागपूरकडे रवाना झाली आहेत. 19 जुलै 2024 रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात परत आणलेली ही अमूल्य ऐतिहासिक वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणाला साक्षी राहण्यासाठी 4लाख 30हजारांहून अधिक शिवप्रेमींनी वाघनखांचे दर्शन घेतले. आज सकाळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या वाघनखांना नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात आले. ब्रिटिश अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा पार पडला. वाघनखांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Nagpur)

हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर असून कित्येक पिढ्यांसाठी हा प्रेरणादायी ठेवा आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही 16 व्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि किर्तीची साक्ष देत आहेत. त्यापैकीच एक असेलल्या शिवरायांच्या वाघनखांचं लंडनहून भारतात आगमन झालं. गेली सात महिने ऐतिहासिक प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता साताऱ्यात होती. आता वाघनखांचा साताऱ्यातील मुक्काम संपला असून आता नागपुरच्या मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात येत आहेत.

गेल्या सात महिन्यांत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने संग्रहालयाला भेट देत या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेल्या या वाघनखांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकांनी गर्दी केली होती. इतिहासाच्या सुवर्णपानाचा साक्षीदार बनण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.आता ही वाघनखं नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवभक्तांसाठी प्रदर्शित केली जाणार आहेत. नागपूरमधील नागरिक आणि पर्यटकांना लवकरच या ऐतिहासिक अस्त्राचे दर्शन घेता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी राज्यात आली आहे ती सध्या सातारा येथे होती, ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या 4 शहरात प्रदर्शित केली जाणार असल्याचं ठरलं असून साताऱ्यातून आता नागपुरात ही वाघनखं जातील. त्यानंतर कोल्हापूर, मुंबईमध्ये वाघनखांचे जतन केले जाईल. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर 1 फेब्रुवारी ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत नागपूर येथे व त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 3 मे 2026पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.



मागील बातमी
...म्हणून मान्याचीवाडीत कर आणि पाणीपट्टी नाही तर लाईट फुकट
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या