पुरंदर : “लेक म्हणजे देवाने दिलेली अमूल्य देणगी” या वाक्याचा प्रत्यय देणारी एक भावनिक आणि हृदयस्पर्शी घटना सध्या पुरंदर तालुक्यात घडली आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे गेल्या काही वर्षांपासून किडनी निकामी झाल्यामुळे गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिसवर अवलंबून राहावे लागत होते.
अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरली ती म्हणजे त्यांचीच लेक, डॉ. ममता शिवतारे- लांडे. वडिलांना नवजीवन देण्यासाठी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एक मुलगी आपल्या वडिलांसाठी किती मोठा त्याग करू शकते, याचे जिवंत उदाहरण घालून दिले.
सोमवारी (दि.३१) मुंबईत पार पडलेल्या किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर सध्या शिवतारे आणि त्यांची मुलगी ममता दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे शिवतारे कुटुंबासह संपूर्ण पुरंदर तालुक्यात दिलासा व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या घटनेला “माणुसकीचा आणि प्रेमाचा सर्वोच्च नमुना” असे म्हटले आहे.
दरम्यान, ममता शिवतारे लांडे यांचे पती शिवदीप यांनी सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्टही प्रचंड चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ममताच्या निःस्वार्थ प्रेमाचे, त्यागाचे, जिद्दीचे भावपूर्ण शब्दांत वर्णन केले आहे. “जीवनात अनेक संकटांना सामोरे गेलो, पण तुझ्या एका निर्णयाने मला पूर्णपणे हादरवून सोडले,” असे ते म्हणतात. ऑपरेशनपूर्वीचे तीन महिने हे कठीण होते. डझनभर वैद्यकीय तपासण्या, हजारो कागदपत्रांची प्रक्रिया, कायदेशीर अडथळे हे सर्व ममताताईंनी धैर्याने आणि एकट्याने सांभाळले, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या पोस्टमधील एक विचार प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जात आहे.