सातारा वॉरियर्सचा महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये दमदार प्रवेश

एमसीएचे सचिव ॲड. कमलेश पिसाळ यांचा पुढाकार; दोन्ही छत्रपतींनी केले अभिनंदन

by Team Satara Today | published on : 13 April 2025


पुणे : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील, लहान शहरांतील गुणी आणि होतकरू खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या फ्रॅंचाईजी बेस्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात सातारा वॉरियर्स या नव्या संघाचा शानदार समावेश झाला आहे.

एमसीएच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमवर १० जून, २०२५ पासून या स्पर्धेचा तिसरा हंगाम सुरू होत आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील क्रिकेट संस्कृतीला भक्कम आधार मिळत असून अनेक ग्रामीण भागातील व छोट्या शहरातील खेळाडूंना आयपीएल आणि भारतीय संघाकडे वाटचाल करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे.

 क्रिकेटमधील नवचैतन्याचा नवा अध्याय : सातारा वॉरियर्स

साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीतून आलेल्या सातारा वॉरियर्स या संघाच्या स्थापनेमुळे एमपीएल मध्ये एक नवे पर्व सुरू होत आहे. या फ्रँचायझीची सहमालकी हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, अल्कोबेव्ह, क्रीडा व फिटनेस क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योगपती श्री. मनप्रीत सिंग उप्पल आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक श्री. गौरव गढोक यांच्याकडे आहे.

या नव्या संघाचा एमपीएलमध्ये समावेश होत असल्याची अधिकृत घोषणा होताच, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित पवार यांनी दोन्ही संघमालकांचे अभिनंदन करत म्हटले, “महाराष्ट्रातील क्रिकेटला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या ध्येयाला सातारा वॉरियर्स संघाच्या समावेशामुळे नवे बळ मिळाले आहे. या नव्या संघाच्या माध्यमातून अनेक नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळेल. हे संघमालक महाराष्ट्रातील क्रिकेटच्या भविष्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.

 सातारा वॉरियर्सच्या प्रवेशासाठी सचिव ॲड. कमलेश पिसाळ यांचा विशेष पुढाकार :

या नव्या संघाच्या एमपीएलमध्ये समावेशासाठी एमसीएचे मानद सचिव ॲड. कमलेश पिसाळ यांनी विशेष पुढाकार घेतला. संघाच्या समावेशाबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, “सातारा वॉरियर्स संघाचं एमपीएल कुटुंबात स्वागत करताना आनंद होत आहे. या नव्या संघामुळे लीगमध्ये उत्साह आणि तीव्र स्पर्धात्मकतेचा नवा अध्याय सुरू होईल. लीगचा दर्जा आणि लोकप्रियता यामध्ये या संघामुळे नक्कीच भर पडेल.

 छत्रपतींचे अभिनंदन आणि समर्थन :

साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही सातारा वॉरियर्स संघाच्या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, “साताऱ्याची भूमी ही ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे. या भूमीने देशाला अनेक दिग्गज दिले आहेत. आज या भूमीतून क्रिकेटच्या क्षेत्रात नवा संघ उदयाला आला आहे, हे आमच्यासाठी गौरवाचे क्षण आहेत. या स्पर्धेतून भविष्यातील खेळाडू घडतील, हीच अपेक्षा.

याचबरोबर, महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही एमसीए आणि सातारा वॉरियर्स संघाचे अभिनंदन करत म्हटले, “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संपूर्ण महाराष्ट्रात क्रिकेटची संस्कृती रुजवण्यासाठी मोलाचे काम करत आहे. याबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री. रोहित पवार व मानद सचिव ॲड. श्री. कमलेश पिसाळ यांचे विशेष कौतुक आहे. सातारा वॉरियर्स संघ स्पर्धेत उत्तम कामगिरी करून साताऱ्याच्या नावाला नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास वाटतो.

 एमपीएलचा तिसरा हंगाम १० जूनपासून रंगणार, महिला लीगही ठरणार खास आकर्षण :

या हंगामात एमपीएलमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार असून, स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा, हॉटस्टार व स्पोर्ट्स १८ या माध्यमांवर होणार आहे. याशिवाय यंदाच्या हंगामात महिलांसाठी स्वतंत्र वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्मृती मंधना, तेजल हसबनीस, देविका वैद्य यांसारख्या भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग असेल.

 एमपीएल: एक यशस्वी व्यासपीठ :

पारंपरिक क्रिकेट स्पर्धांपेक्षा वेगळ्या शैलीत रंगणारी ही लीग ऋतुराज गायकवाड, स्मृती मंधना यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना स्थानिक युवा खेळाडूंशी जोडते, त्यांच्यासोबत खेळण्याचा आणि शिकण्याचा अनुभव देते. त्यामुळे ही स्पर्धा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नसून ती प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याचा योग्य प्लॅटफॉर्म ठरत आहे.

सातारा वॉरियर्स संघाच्या सामावेशामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीगला नवीन उर्जा आणि नवी दिशा मिळणार आहे. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार, सचिव ॲड. कमलेश पिसाळ, आणि साताऱ्याचे दोन्ही छत्रपती यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे महाराष्ट्रातील क्रिकेटचा दर्जा अधिक उंचावेल, हे निश्चित आहे.

या तिसऱ्या हंगामात क्रिकेटप्रेमींसाठी भरपूर थरार, नवोन्मेष आणि महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेल्या नव्या टॅलेंटचा जलवा पाहायला मिळणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रुप अध्यक्षासह साऊंड सिस्टिम मालकावर गुन्हा
पुढील बातमी
भक्ती, शक्तीचे प्रतीक असलेल्या पवनपुत्र हनुमानाची जयंती उत्साहात साजरी

संबंधित बातम्या