सातारा : राज्यात सर्वत्र जातीत जातीत भांडणे, धार्मिक तेढ, सामाजिक विषमता वाढलेली पाहायला मिळते आहे. हे सर्व दुर करण्यासाठी आणि स्व.यशवंतराव चव्हाण, शाहु, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहील, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. पुन्हा राज्यात स्व. यशवंतराव चव्हाण विचार काँग्रेस आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सातारा तालिम संघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान साहेबराव पवार यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्ताने सातारा तालिम संघ येथे आयोजित सत्कार सोहळयात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अॅङ उदय पाटील उंडाळकर, काँग्रेसचे मलकापूर नगरपंचायतीचे मनोहर शिंदे, महिला काँग्रेसच्या रजनी पवार, अन्वर पाशा खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते साहेबराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, आम्हाला नेहमीच चांगले मार्गदर्शन करणारे कांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते साहेबराव पवार यांचा जिल्ह्यातील काँग्रेस ला अभिमान आहे. ते सर्वांचे मार्गदर्शक आहेत.
सध्याचे सरकार जातीजातीत भांडणे, धार्मिक तेढ, सामाजिक विषमता वाढवत आहे. राज्य सत्ताधारी कुठे नेते आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. स्व.यशवंतराव चव्हाण, शाहु, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र घडविण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहिल. माझे आणि साहेबराव भाऊंचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मी त्यांची आस्थेने चौकशी करत असतो. पाच-सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना कळले की, त्यांच्या वयाची ९९ वर्ष पुर्ण होत आहेत. तेव्हाच त्यांच्या सत्कार सोहळयाच्या कार्यक्रमाचे नियोजनाबाबत दीपक मला बोलले होते. आज हा कार्यक्रम पाहिला अन् हदय भरुन आले. कार्यक्रम पाहून सुधीर आणि दीपक यांनी केलेल्या नियोजनानुसार भाऊ अजून याही वयात कसे कणखरपणे बोलू शकतात हे कोडे उलघडते आहे. साहेबराव भाऊ यांचे आमच्यासाठी आदरणीय व्यक्तीमत्व आहे. त्यांचा काँग्रेसमधील प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला परीस स्पर्श केलेला आहे. भांडण करत जावू नका, एकीने रहा, विकास कामे करा, सामान्य लोकांची गाऱ्हाणी ऐकून ती सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असे ते सांगतात. आज आपण बघतोयच सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र कुठे नेवून ठेवला आहे. याबाबतची चिंता लागून राहते. महाराष्ट्रात जातीयवाद, धार्मिंक तेढ, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, सामान्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पण काँग्रेस राज्यात पुन्हा स्व.यशवंतराव चव्हाण, स्व. विलासकाकांच्या विचारांचा, फुले, शाहूंचा विचार शेवटपर्यत राहील याचा विश्वास देतो. साताऱ्याचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगत त्यांनी साहेबराव भाऊ यांनी मला जावली खोरं बोटाला धरुन फिरवले असल्याचे सांगितले.
सातारा तालिम संघाची यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. सुधीर व दीपक पवार यांनी स्वागत केले. सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून अनेक मान्यवर आणि नामांकित पैलवान या कार्यक्रमाला उपस्थित होते.
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण
by Team Satara Today | published on : 15 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा