मुंबई : महाराष्ट्र राज्य मंडळाने शैक्षणिक वर्षासाठी एकसमान दिनदर्शिका आणली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सुट्ट्या एकाच वेळी असतील. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये आता 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत वार्षिक परीक्षा होणार आहेत. यामध्ये 1 मे रोजी निकाल जाहीर होतील आणि 2 मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही दिनदर्शिका लागू असेल.
राज्यभरातील सुमारे 90,000 शाळांना या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेत समानता आणि सुसूत्रता येईल, असा सरकारचा दावा आहे. मात्र शाळा व्यवस्थापनांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः, शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी आणि निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या निर्णयाचा मुख्य उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्याची समान संधी मिळावी हा आहे. कोकण ते विदर्भ सगळ्या शाळांना ही दिनदर्शिका लागू असेल.