अठरा लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी दोघांना अटक; कराडमधील कारवाईत दागिने जप्त; अल्पवयीन मुलगा ताब्यात

by Team Satara Today | published on : 19 November 2025


कराड : १८ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी वैभव सुभाष वाघमारे (वय 30, रा. विद्यानगर, सैदापूर, ता. कराड) आणि अभिजित सुभाष बोडरे (वय 31, रा. निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांकडून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विद्यानगर येथील एक दाम्पत्य मुंबईत नोकरीला आहे. या दाम्पत्याच्या मुंबईतील घरात काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. त्यामुळे या दाम्पत्याने त्यांच्याकडील 17 लाख रुपयांचे दागिने विद्यानगर येथे वडिलांकडे ठेवले होते. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य विद्यानगरला आले. त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने पाहिले होते. त्यानंतर हे दाम्पत्य शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाणार असल्याने, त्यांनी वडिलांकडे दागिने मागितले. वडील कपाटातून दागिने काढायला गेले असता, ते चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दहा लाख 16 हजार रुपयांचे किंमतीचे सोन्याचे गंठण, एक लाख 7 हजार 966 रुपयांची सोनसाखळी, एक लाख 84 हजार रुपयांचा नेकलेस आणि तीन लाख 86 हजार रुपयांचा राणीहार, असे दागिने लंपास केले होते.

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश माळी यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून वैभव वाघमारे, अभिजित बोडरे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा; भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय; पत्रकार परिषदेत उमेदवार जाहीर
पुढील बातमी
संतप्त काशीळकरांनी महामार्ग रोखला; अपूर्ण वाहतूक सुविधेमुळे एकाचा गेला जीव; ठेकेदारावर संताप

संबंधित बातम्या