सांगलीच्या शौर्य पाटील मृत्यूप्रकरणात चार शिक्षिका निलंबित; दिल्ली सरकारची चौकशी समिती नियुक्त, सुसाईड नोटमुळे प्रकरणाला गंभीर वळण

by Team Satara Today | published on : 22 November 2025


दिल्ली :  दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा 16 वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने राजधानीतच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठं दुःख आणि संताप उसळला आहे. शौर्यने आत्महत्या करण्यापूर्वी दीड पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात त्याने शाळेच्या प्राचार्यांसह तीन शिक्षिकांना थेट जबाबदार धरलं आहे. या सुसाईड नोटमुळे संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे.

शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील असून काही वर्षांपूर्वी त्याचे कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले. हुशार आणि शांत स्वभावाचा असलेला हा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून तणावात असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. पण इतका मोठा निर्णय तो घेईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती.

या घटनेनंतर शाळेबाहेर विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि नातेवाईकांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी शौर्यच्या समर्थनार्थ शाळेबाहेर मोठा जमाव जमला होता. सर्वांचं एकच म्हणणं “दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, शौर्यला न्याय मिळालाच पाहिजे!”

आंदोलनादरम्यान ज्या प्रकारे शाळेवर आणि शिक्षकांवर आरोप करण्यात आले, त्यातून परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट दिसतं. शौर्यने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, तो मानसिक छळाला कंटाळला आहे. सतत अपमान, शैक्षणिक भार, अन्यायकारक वागणूक आणि प्राचार्यांचा दबाव हे त्याच्या मानसिक त्रासाचं मुख्य कारण असल्याचं त्यात नमूद आहे.  या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन दिल्ली सरकारने चार शिक्षिकांचे निलंबन केले आहे. तसेच या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. समितीला १० दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पालक आणि आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की हे निलंबन फक्त नावेपुरते आहे आणि कारवाईचा देखावा केला जातोय.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
छत्रपती महोत्सव पाहण्यासाठी सातारकरांची तोबा गर्दी; प्रदर्शनाचा लाभ रविवार दि. 23 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी अवश्य घ्यावा - सोमनाथ शेटे
पुढील बातमी
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थकबाळासाहेब खंदारे साताऱ्यात बिनविरोध

संबंधित बातम्या