फलटण : शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबद्दल फलटण येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडला प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२६’ सलग दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने संचालिका कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि डिस्टिलरी विभागाचे महाव्यवस्थापक संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ऊर्जा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ‘पर्यावरण संरक्षण आणि कार्यक्षम औद्योगिक व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा सर्वोत्कृष्ट साखर इथेनॉल उत्पादक’ या श्रेणीत कंपनीने हा मान मिळवला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा कंपनीचे प्रवर्तक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज समूहाने हरित ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भरारी घेतली आहे. साखर, इथेनॉल आणि सहवीज निर्मितीच्या एकात्मिक प्रकल्पात कंपनीने सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या शाश्वत उत्पादन पद्धतींचा अवलंब केला आहे.
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाला बळ देत देशाच्या ऊर्जा सुरक्षेत कंपनी मोठे योगदान देत असून, भविष्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्पाच्या माध्यमातून अक्षय ऊर्जा क्षेत्राचा विस्तार केला जात आहे. याशिवाय शेतकरी कल्याण आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्यही कंपनी अविरत करत आहे. सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या राष्ट्रीय बहुमानामुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून स्वराज परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
स्वराज ग्रीन पॉवरला सलग दुसऱ्या वर्षी ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड’
नवी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; पर्यावरणपूरक इथेनॉल उत्पादनाची राष्ट्रीय पातळीवर दखल
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा