नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही राज्यांतील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी व वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारची विशेष पथके पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. ते स्वतः अधिकारी आणि तज्ज्ञांच्या पथकासह महाराष्ट्राचा दौरा करणार असून केंद्रीय पथक येत्या ३ ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेणार आहे.
शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी येथे आयोजित ‘राष्ट्रीय कृषी परिषद-रब्बी अभियान २०२६’चे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील दोनतृतीयांश भाग दुष्काळाच्या सावटाखाली असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. कर्नाटकातही दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. केंद्र सरकार दोन्ही राज्यांच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून प्रत्यक्ष पाहणीच्या अहवालानंतर तातडीने आवश्यक ती पावले उचलली जातील. महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. अशा भागांतील शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच आगामी रब्बी हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपलब्ध पाण्यानुसारच पिकांची निवड करा
कमी पाणी उपलब्ध असणाऱ्या भागांत अधिक पाण्याची गरज असलेल्या पिकांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते, असा इशारा कृषिमंत्र्यांनी दिला. यावर त्यांनी जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाणी यांचा ताळमेळ घालूनच पिकांची निवड करावी, असा सल्लाही दिला.
महाराष्ट्र, कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून तीव्र चिंता; केंद्रीय पथक करणार पाहणी - केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा