कुरणेवाडी दरोड्यातील टोळी जेरबंद; म्हसवड पोलीस व एलसीबीची संयुक्त कारवाई

by Team Satara Today | published on : 08 May 2026


म्हसवड : कुरणेवाडी येथील मिसाळ वस्तीत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून दागिने व रोकड लंपास करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. म्हसवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अवघ्या ४८ तासांत ही कारवाई केली असून, संशयितांकडून ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संशयितांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ मे रोजी मध्यरात्री कुरणेवाडी येथील प्रल्हाद ज्ञानू मिसाळ (वय ६५) आणि त्यांची पत्नी सुलाबाई मिसाळ (वय ६२) हे आपल्या घराच्या सोप्यात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे ७२ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली होती. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

​जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयितांचा माग काढला.

​या कारवाईत पोलिसांनी दादा अण्णा बुधावले (वय २०), संजय अण्णा बुधावले (वय २३), महादेव अण्णा बुधावले (वय २२), हर्षद युवराज बुधावले (वय १९), ऋतिक भारत बनसोडे (वय २०, सर्व राहणार वरकुटे मलवडी, ता. माण) यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली असता संशयितांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

​सदरची यशस्वी कारवाई म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अनिल वाघमोडे आणि एलसीबीच्या पथकाने केली असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बहुचर्चित टीसीएस धर्मांतर प्रकरण; मुख्य संशयित निदा खानला संभाजीनगरमधून अटक
पुढील बातमी
साताऱ्यात भररस्त्यात तरुणीचा विनयभंग; नराधमाने घेतला चावा, नागरिकांनी काढले चांगलेच बुकलून

संबंधित बातम्या