सातारा : सातारा ते कास रस्त्यावर असलेल्या अनावळे गावाच्या वर असलेल्या टेकडीवर अनेक दगड धोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात हे दगड खाली आल्यास ते खाली असलेल्या घरांवर येवू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची पावसाळ्यापूर्वी तातडीने पाहणी करुन दगड हटवावे, अशी मागणी आत्माराम माने व ग्रामस्थांनी केली आहे.
अनावळे येथे गावाच्या उत्तरेस असणार्या टेकडीवरील उतारावर असणारे मोठमोठे दगड पावसाळ्यात माती भुसभुशीत झाल्यावर किंवा भूस्खलन झाल्यास उतारावरून गावातील घरावर येऊ शकतात. या टेकडीच्या पायथ्याशी उतारावर ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी इमारत व इतर ग्रामस्थांची घरे किंवा सर्व गावठाण हद्दीतील घरे आहेत. उतारावरील दगडांच्या टप्यात ही घरे येतात. दगड खाली आल्यास मोठी जीवीत व वित्तहानी होऊ शकते प्रशासनाने पाहणी करून उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.