सातारा : पुण्याहुन बेळगावला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला बोरगाव बसथांब्यानजीक अपघात होऊन बस सेवा रस्त्यावरच उलटली. या अपघातामध्ये एकुण आठ जण जखमी झाले. त्यांना सातारा येथील खाजगी तसेच कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही.
दि. १४ रोजी सकाळी सातच्या सुमारास पुणे पर्वती येथून बेळगाव कर्नाटक येथे रविश देसाई यांच्या लग्नासाठी वऱ्हाड निघाले होते. त्यासाठी पुण्यातील एका खाजगी कंपनीची बस क्र. (डी. डी. ०१ डब्लू ९५९८) ही ठरवली होती. त्यावरील चालक सतिश वसंत सोट ( रा. तरडगाव ता कर्जत जि. अहिल्यानगर) हा होता. बस सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बोरगाव येथील सेवा रस्त्याने निघाली असता चालकाने अचानक रस्त्याकडेच्या बंदिस्त नाल्यावरून पलीकडच्या ढिगाऱ्यावर नेली. मात्र बस तिथं न थांबता सेवारस्त्यावर उलटली . त्यामध्ये श्रींकांत कृष्णा देसाई , श्वेता श्रीकांत देसाई , हेमेंत रामकृष्ण देसाई , मनिष मनोहर देसाई ,स्वप्नील लक्ष्मीकांत चव्हाण , सुमती शांताराम मोरे , ऋतुजा रविंद्र देसाई व अपेक्षा महेंद्र जाधव (सर्व रा. पुणे) हे जखमी झाले. अपघातानंतर चालक भितीने अपघात स्थळावरून पळून गेला. मात्र बोरगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार व बोरगावच्या नागरिकांनी अपघातस्थळाकडे धाव घेत जखमींना मदत केली. अपघातामुळे महामार्गावर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. परंतू बोरगाव पोलिस ठाण्याच्या वाहतुक अंमलदारांनी काही वेळातच वाहतुक सुरळीत केली.
महेंद्र रविंद्र जाधव यांनी या घटनेची खबर दिली असुन चालक सतिश सोट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार अमोल गवळी, कॉ. संजय जाधव करत आहेत.