देगावमध्ये पाटेश्वर डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या जेरबंद

ग्रामस्थ व वन विभागाच्या संयुक्त मोहिमेला यश; रात्री ११ वाजता पिंजऱ्यात अडकला, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : सातारा तालुक्यातील देगाव येथील पाटेश्वर डोंगराच्या पायथ्याशी अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात ग्रामस्थ आणि वन विभागाला मोठे यश आले. सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने देगावसह पायथ्याशी असलेल्या परिसरातील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
पाटेश्वर डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवार व वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सातत्याने जाणवत होता. यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या संभाव्य धोक्याची गांभीर्याने दखल घेत देगावमधील ग्रामस्थ आणि वन विभागाने त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून सापळा रचण्याचे नियोजन केले. बिबट्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचा अचूक अंदाज घेत वन विभागाचे अभिषेक संजय जाधव यांनी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी पिंजरा लावला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान देगावचे स्वप्नील रामदास पवार आणि सचिन साळुंखे यांच्यासह जागरूक ग्रामस्थांनी वन विभागाच्या पथकाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले. ग्रामस्थांची सतर्कता आणि वन विभागाचे अचूक नियोजन यामुळे सोमवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या सावजाच्या शोधात आला असता थेट पिंजऱ्यात जाऊन जेरबंद झाला.
बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची खात्री होताच घटनास्थळावरून वन विभागाला तात्काळ संपर्क करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच वनपाल रावसाहेब शिंदे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणतीही जीवितहानी न होता ही मोहीम अत्यंत संयमाने आणि सुरक्षितरीत्या हाताळण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिबट्याला पिंजऱ्यासह सुरक्षितरीत्या वन विभागाच्या वाहनात चढवून पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. देगाव ग्रामपंचायत कर्मचारी आणि परिसरातील युवकांनी दाखवलेली सजगता आणि वन विभागाचा समन्वय यामुळे बिबट्याचा धोका वेळीच टळला. यशस्वी रीतीने पार पडलेल्या या संयुक्त मोहिमेबद्दल आणि दाखवलेल्या तत्परतेबद्दल देगावचे पोलीस पाटील मनाजी निकम यांनी वन विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थांचे विशेष आभार मानले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या