सातारा : बार्टी’च्या पुण्यातील मुख्य कार्यालयासह राज्यात विविध विभागांत असलेल्या कार्यालयांत बाह्य स्रोताद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचार्यांना गेल्या दहा वर्षांपासून वेतनवाढ झाली नाही. याच्या निषेधार्थ गुरुवारपासून या कर्मचार्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्याचे समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट यांना या कर्मचार्यांनी अनेकवेळा निवेदने दिली. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या कर्मचार्यांना बेमुदत आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले असून, गुरुवारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते.
‘बार्टी’ कार्यालयात बाह्य स्रोताद्वारे सुमारे बाराशे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये वाहनचालक, कार्यालय सहायक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आस्थापना सहायक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक समतादूत, तालुका समन्वयक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये ’बार्टी’ मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, मुक्तिभूमी येवला, बार्टी विभागीय कार्यालय नागपूर, त्याचबरोबर सर्व जिल्हा जातपडताळणी समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
काम बंद आंदोलनाच्या आजच्या दुसर्या दिवशी सातारा जिल्ह्यातील बार्टीच्या सर्व कर्मचार्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. मानधन वाढ बाबत जोपर्यंत ठाम असा शाश्वत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा आंदोलन कर्त्यांच्या भावना आहेत.