सातारा : उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, दिवसाचे तापमान ४१ अंशापर्यंत जात आहे. त्यातच टंचाईच्या झळाही वाढू लागल्या आहेत. माण, खटावसह पाच तालुक्यांत ६० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ५५ गावे ३५१ वाड्यांवरील ७८ हजारांवर लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. वाई, कोरेगाव व पाटण या जास्त पावसाच्या तालुक्यांतही टंचाई जाणवू लागली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीच्या प्रमाणातच राहिल्यामुळे सध्या ओढे, नाले कोरडे पडले असून, अनेक ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. माण तालुक्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. येथे ४७ टॅंकरद्वारे ४५ गावे ३३२ वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. १४ विहिरी आणि सहा बोअरवेल अधिगृहीत केल्या आहेत.
माण तालुक्यानंतर आता सधन वाई, कोरेगाव तसेच जास्त पावसाचा तालुका असलेल्या पाटण तालुक्यातील दुर्गम भागात टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. पाटणमध्ये एक गाव आणि चार वाड्यांना चार टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. कोरेगाव तालुक्यात दोन गावांना दोन टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. वाई तालुक्यात चार गावे आणि तीन वाड्यांना पाच टॅंकरने पाणी दिले जात आहे, तसेच खटाव तालुक्यातील तीन गावे आणि १२ वाड्यावस्तांवर तीन टॅंकरने पाणी दिले जात आहे. जिल्ह्यात ७८ हजार २१ लोकसंख्या, तर ५० हजार ५४ पशुधन टंचाई बाधित आहे.
टॅंकर सुरू असलेली तालुकानिहाय गावे :
माण तालुका : बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, धुळदेव, वरकुटे-म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारुगड, कुळकजाई, शिरवली, सत्रेवाडी, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बुद्रुक, महिमानगड, सुरुपखानवाडी.
पाटण तालुका : जाधववाडी, जंगलवाडी, शिद्रुकवाडी वरची, शिद्रुकवाडी-काढणे, भोसगाव (आंब्रुळकरवाडी), चव्हाणवाडी, नाणेगाव.
वाई तालुका : मांढरदेव गावठाण, गुंडेवाडी, बालेघर, आनंदपूर, गडगेवाडी, कासुर्डेवाडी, अनपटवाडी.
कोरेगाव तालुका : भंडारमाची, बिचुकले.
खटाव तालुका : मांजरवाडी, नवलेवाडी, जायगाव.